CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:31 AM2020-04-16T07:31:25+5:302020-04-16T07:45:36+5:30
अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत.
वॉशिंग्टन : कोरोनाचा सर्वाधिक फटका आता अमेरिकाला बसू लागला आहे. चीननंतर इटली, स्पेन आणि इराणला कोरोनाने ग्रासलेले होते. मात्र, आता अमेरिकेमध्ये दिवसाला २६०० कोरोनाचे बळी जात असल्याने महासत्ता मेटाकुटीला आली आहे. असे असुनही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तेथील लॉकडाऊन उठविण्याच्या विचारात आहेत.
अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यपासून मृतांचा आकडा रोज २००० पार करत होता. बुधवारीच केवळ १५०० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज पुन्हा एकाच दिवशी २६०० लोकांचा बळी गेल्याने अमेरिकेने रेकॉर्ड केले आहे. यावर ट्रम्प यांनी अमेरिकेने कोरोनाच्या बाबतीत आता शिखर गाठले असल्याची टिपण्णी केली आहे. आज ट्रम्प जी-७ संघटनेच्या देशांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. यामध्ये ते आणि सदस्य देश कोरोनावरून आंतरराष्ट्रीय समन्वयावर चर्चा करणार आहेत. या समुहामध्ये ब्रिटेन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान सहभागी आहेत.
US President Donald Trump says US has likely 'passed the peak' on #coronavirus cases: AFP news agency (File pic) pic.twitter.com/dBR5LOjulQ
— ANI (@ANI) April 15, 2020
अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. गेल्या शुक्रवारी २०६९ लोकांचा मृत्यू झाला होता. रविवारी आणि सोमवारी १५०० जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेला लॉकडाऊन केल्याने दिवसाला २५ दशलक्ष डॉलरचे नुकसान झेलावे लागत आहे. एकट्या न्यू यॉर्कमध्ये १० हजार जणांचा मृत्यू झाला असून आता या राज्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर लुसीयाना आणि कॅलिफोर्निया ही राज्ये कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत.
तर जगभरात 1,26,871 जणांचा मृत्यू झाला असून २० लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे.