CoronaVirus: जगातील ३०% रुग्ण एकट्या अमेरिकेत; मृतांचा आकडा ५० हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 06:22 AM2020-04-25T06:22:37+5:302020-04-25T06:54:27+5:30
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्नियामध्ये ३० हजार बळी; 40000 नागरिकांचा मागील ३० दिवसांत मृत्यू
नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून, या भयावह आजाराने आतापर्यंत ५० हजार ३१६ जणांचा बळी घेतला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५ हजार ७४० मृत्यू एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. न्यूयॉर्कखेरीज न्यू जर्सी, मिशिगन, मॅसेच्युएट्स आणि कॅलिफोर्निया या शहरांत आणि प्रांतांमध्येही कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यांची संख्या वाढत चालली आहे. या पाच ठिकाणी मिळून आतापर्यंत सुमारे ३० हजार लोक मरण पावले आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्स व लॉकडाउन आवश्यक असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाउन उठवण्याचा सल्ला सर्व प्रांतांच्या गव्हर्नरना दिला आहे. आर्थिक व अन्य व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी त्यांची इच्छा असली, तरी त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती अमेरिकेतील जनतेला वाटत आहे. राज्यांच्या गव्हर्नरचेही तसेच म्हणणे आहे.
800888 जणांना अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. जगात कोरोना रुग्णांची संख्या २७ लाख ९९ हजार ७७२ असताना, त्यापैकी सुमारे ३० टक्के रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत.
50%रुग्ण तर न्यूयॉर्क व आसपासच्या भागांत आहेत. त्याखालोखाल न्यू जर्सीचा क्रमांक आहे. पाच प्रांत सोडल्यास अन्य भागांत प्रादुर्भाव बराच कमी आहे, असे दिसत आहे. मात्र अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत.
इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी आणि इराणमध्येही रुग्ण व मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. तेथे २४ मार्च रोजी मृतांची संख्या ९९३९ इतकी होती. एका महिन्यात तो आकडा ५० हजारांवर गेला. म्हणजे ३० दिवसांत ४० हजार अमेरिकन कोरोनाने मरण पावले.
1.5 लाख मृत्यू युरोपात
युरोपीय राष्ट्रांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून मृतांची संख्याही तेथेच वाढत आहे. या देशांमध्ये मिळून मृतांची संख्या १ लाख ५० हजारांच्या घरात आहे.
या देशांत मृत्यूचे प्रमाण अधिक
इटली : मृतांची संख्या २६ हजारांच्या जवळ पोहोचली असून, स्पेनमध्ये २२ हजार ५०० हून अधिक लोक मरण पावले आहेत.
फ्रान्स : गेल्या १० ते १२ दिवसांत मृतांची संख्या वाढत गेली आणि आता तो आकडा २२ हजारांच्या घरात पोहोचला आहेत.
ब्रिटन : १८ हजार ७३८, तर बेल्जियममध्ये आतापर्यंत ६६८९ जण मृत्यमुखी पडले आहेत.
जर्मनी : मृतांचा आकडा ५५७५ झाला असून, इराणमध्ये ही संख्या ५५७४ आहे.