Coronavirus : अमेरिकेत ३0 टक्के लोकांना घरीच थांबण्याच्या सूचना, आतापर्यंत ४५० बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:52 AM2020-03-24T00:52:53+5:302020-03-24T06:06:38+5:30
coronavirus : रँड पॉल हे अमेरिकेतील पहिले कोरोनाग्रस्त सिनेटर ठरले असून त्यांच्यावर क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ हजारांहून अधिक झाली असून, देशात आतापर्यंत ४५८ जणांचा बळी गेला आहे. साथीला अटकाव करण्याकरिता अमेरिकेतील प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीला घरीच थांबण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे केंटुकी येथील सिनेटर रँड पॉल यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
रँड पॉल हे अमेरिकेतील पहिले कोरोनाग्रस्त सिनेटर ठरले असून त्यांच्यावर क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू आहेत. त्या देशात न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन या तीन ठिकाणी कोरोनाच्या साथीने कहर माजविला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, न्यूयॉर्कवासीयांना आवश्यक गोष्टींचा नियमित पुरवठा करण्यात येत असून त्यात कोणतीही कमतरता राहू देणार नाही.
न्यूयॉर्कमध्ये १५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तिथे या साथीमुळे आतापर्यंत ११४ जण मरण पावले आहेत. या साथीमुळे न्यूयॉर्कमध्ये आगामी दहा दिवसांत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साधनांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखी व्हेंटिलेटर मिळाले नाही तर मृतांची संख्या वाढू शकते, असे त्या शहराचे महापौर बिल दे ब्लासिओ यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)