Coronavirus: चीनमध्ये ५ कोटी लोकांनी लुटला पर्यटनाचा आनंद; पाच दिवसांची सार्वजनिक सुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:13 PM2020-05-05T23:13:15+5:302020-05-06T07:22:01+5:30
सरकारला एकाच दिवशी मिळाला १.३८ अब्ज डॉलरचा महसूल
बिजिंग : कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या व या साथीचे अद्याप पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या चीनमध्ये १ मे रोजी, कामगार दिनापासून सलग पाच दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर झाली आहे. त्याच्या पहिल्या दोन दिवसांत, सुमारे पाच कोटी लोकांनी देशातच विविध पर्यटनस्थळी जाऊन सहलीचा आनंद लुटला. ही सुटी उद्या मंगळवारी संपणार असून तोवर हा आकडा नऊ कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.
चीनमध्ये या सुट्या सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, १ मे रोजी देशभरात सुमारे २ कोटी ३० लाख लोक विविध ठिकाणी सहलीला गेले होते. त्यातून सरकारला १.३८ अब्ज डॉलर इतके उत्पन्न मिळाले. ‘कोविड-१९’मुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये हाहाकार माजलेला असताना, चीनमध्ये मात्र परिस्थिती टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत. चीनमध्ये कोरोना विषाणूचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या हुबेई प्रांतापासून ते अन्य ठिकाणी या साथीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे.
चीनमधील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशामध्ये २ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. त्यामध्ये विदेशवारीहून परतलेल्या एका नागरिकाचा समावेश आहे. चीनमध्ये रुणांची एकूण संख्या ८२ हजारांवर पोहोचली असून, साडेचार हजारपेक्षा जास्त रुग्ण मरण पावले आहेत.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पहिले पाऊल
देशातील विविध ठिकाणी सहलीला जाऊ इच्छिणाºया पर्यटकांपैकी फक्त ३० टक्केच पर्यटकांना सरकारने परवानगी दिली आहे. चीनमधील सर्व पर्यटस्थळे पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र गेल्या शुक्रवारपासून दिसत आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे हे उचललेले पहिले पाऊल आहे. या प्रयत्नांत नक्की यश येईल, असा विश्वास सत्ताधारी असलेल्या कम्युनिस्ट पार्टीने व्यक्त केला आहे.