Coronavirus : इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू; फ्रान्समधले 112 जण गेले जिवानिशी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:18 AM2020-03-22T10:18:31+5:302020-03-22T10:22:06+5:30
जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीतील स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे.
रोम : कोरोना व्हायरस प्रादुर्भाव जगभरातल्या 179 देशांमध्ये फैलावला असून, जवळपास 2 लाख 45 हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत, तर तब्बल 11 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे जिवानिशी जावं लागलं आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतर इटलीला सर्वाधिक फटका बसला असून, कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे.
इटलीत एका दिवसांत 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतल्या आतापर्यंतच्या मृतांची संख्या 4825वर गेली आहे. जगभरात या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 38.3 टक्के आहे. इटलीतील स्थिती ही चीनपेक्षा जास्त खराब आहे. इथे कोविड-19 (COVID-19)ची लागण झालेल्यांची संख्या 53578 एवढी आहे.
मिलानजवळील नॉर्थ लोम्बर्डीमध्ये मृतांचा आकडा तीन हजारांपेक्षा जास्त झाला आहे. इटलीमध्ये होणाऱ्या एकूण मृतांच्या संख्येपैकी हे दोन तृतीयांश आहे. इटलीमध्ये शुक्रवारपासून 1420 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योजनात आलेल्या सरकारच्या सर्व उपायांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 112 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 562 पर्यंत पोहोचला आहे. या विषाणूमुळे 6172 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. रुग्णालयात 1525 लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण प्रदेशात हा साथीचा रोग झपाट्याने पसरत असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे.
WHOनं दिला इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस म्हणाले की, जगभरात 2 लाख 10 हजारांहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. आजारपणामुळे 11 हजार जणांना प्राण गमावावे लागले आहेत. दिवसेंदिवस या आजाराची तीव्रता वाढत आहे. या आजाराला बहुतेक ज्येष्ठ बळी पडले आहेत. परंतु तरुणदेखील त्यापासून अलिप्त नाहीत. आकडेवारी सांगते की, बर्याच देशांमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले आहे.