CoronaVirus: अवघ्या १७ वर्षांची सोमाया बनवतेय व्हेंटिलेटर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:11 AM2020-04-22T04:11:33+5:302020-04-22T06:57:33+5:30
वापरलेल्या गाडीच्या पार्टसमधून कमी खर्चाचं व्हेंटिलेटर बनवण्यासाठी सोमाया आणि तिच्या पाच मैत्रिणींना रोज संचारबंदी चुकवत मेकॅनिकच वर्कशॉप गाठावं लागत आहे.
अफगाणिस्तान
सतरा वर्षांची सोमाया फारूकी आणि तिच्या पाच मैत्रिणी सध्या एका मिशनवर आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून या सहाजणी जीव वाचवण्याचं यंत्र तयार करत आहेत. वापरलेल्या गाडीच्या पार्टसमधून कमी खर्चाचं व्हेंटिलेटर बनवण्यासाठी सोमाया आणि तिच्या पाच मैत्रिणींना रोज संचारबंदी चुकवत मेकॅनिकच वर्कशॉप गाठावं लागत आहे.
युद्धग्रस्त अफगाणिस्तान कोरोना विषाणूशी अक्षरश: रिकाम्या हातानं लढतो आहे. जवळपास साडेतीन-चार कोटी लोकसंख्य्या असलेल्या अफगाणिस्तानात फक्त ४०० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत आणि युद्धानं बेजार असलेल्या अफगाणिस्तानकडे व्हेंटिलेटर्स बाहेरून मागवण्याइतकेही पैसे नाहीत. आपल्या देशाची मदत कोण करेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी उभं राहिलं पाहिजे या तडफेनं आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सोमाया आणि तिच्या पाच मैत्रिणी कमी खर्चाचं व्हेंटिलेटर बनवण्याचं मिशन पूर्ण करत आहेत.
आपण तयार केलेल्या व्हेंटिलेटरद्वारे एक जरी जीव वाचला तरी आपल्या कष्टाचं सार्थक होईल, असं सोमायाला वाटतं.
एका पिढीपूर्वी या देशात मुलींना शिकण्याची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागली. मुलींच्या शिकण्यावरील निर्बंधामुळे सोमायाच्या आईलाही आपलं शिक्षण सोडून द्यावं लागलं, पण अनेकांच्या प्रयत्नांनंतर अफगाणिस्तानातल्या मुली आज शिकत आहेत. आपल्याला शिकायला मिळतंय हे आपल्यासाठी खूप आहे आणि आता आपल्या लोकांसाठी काम करण्याची, त्यांच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे, याची जाणीव असल्यामुळेच सोमाया आणि तिच्या मैत्रिणी व्हेंटिलेटर बनवण्यासाठी धडपडत आहेत.
पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात सोमाया आणि तिच्या मैत्रिणी राहातात. या भागात संचारबंदीही कडक आहे, पण दररोज सकाळी सोमायाचे वडील त्यांच्याकडील चार चाकी काढतात. त्यात सोमाया आणि तिच्या मैत्रिणींना घेतात आणि संचारबंदी चुकवत आड रस्त्यानं शहराबाहेरील वर्कशॉप गाठतात. या वर्कशॉपमध्ये दिवसभर या मुली व्हेंटिलेटर बनविण्याचे काम करतात आणि पुन्हा सोमायाचे वडील त्यांना गाडीत घालून लपत छपत घरी आणतात. जीव धोक्यात घालून जीव वाचवण्याचं यंत्र तयार करणं एवढाच या सगळ्याजणींचा या धडपडीमागचा उद्देश. टोयोटा गाडीचे विंडशीटस, वाइपर मोटर, बॅटरी यांच्या साहाय्यानं व्हेंटिलेटर्स बनवण्याचा प्रयत्न सोमाया करत आहे. जूनच्या सुरुवातीला हे व्हेंटिलेटर तयार होईल. मग आरोग्य खात्याला ते सुपूर्द केलं जाईल. आधी प्राण्यांवर त्याची चाचणी घेतली जाईल आणि ती यशस्वी होताच हे व्हेंटिलेटर रुग्णांच्या सेवेत वापरलं जाईल. अवघड काळात आपल्या देशाच्या उपयोगाला आपलं ज्ञान येण्यासाठी सोमाया आणि तिच्या मैत्रिणी आपला जीव पणाला लावत आहेत.