Coronavirus: ‘या’ कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत; अमेरिकेची मागणी भारत पूर्ण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 02:34 PM2020-04-06T14:34:50+5:302020-04-06T14:39:13+5:30

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं औषध वा लस तयार झाली नाही.

Coronavirus: America President Donald Trump seeks help for India PM Narendra Modi pnm | Coronavirus: ‘या’ कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत; अमेरिकेची मागणी भारत पूर्ण करणार?

Coronavirus: ‘या’ कारणांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत; अमेरिकेची मागणी भारत पूर्ण करणार?

googlenewsNext
ठळक मुद्देभारतात मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन उत्पादन केले जातेसध्या या औषधाच्या निर्यातीवर बंदी आहेया औषधाचा वापर करुन कोरोना रुग्णांना बरे केले जात आहे

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला असताना काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ४ एप्रिल रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत देशवासियांना माहिती दिली. अमेरिका आणि भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करेल असं मोदींनी सांगितले.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमधून अमेरिकेला भारताची कोणत्याप्रकारची मदत अपेक्षित आहे याची माहिती दिली नाही. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील मीडियाशी बोलताना खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन संवाद साधला. भारतात मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन उत्पादन केले जाते. सध्या या औषधाच्या निर्यातीवर बंदी आहे. भारतात या औषधाची प्रचंड मागणी आहे कारण त्यांची लोकसंख्या जास्त आहे. पण आम्हालाही या औषधाची गरज आहे. त्यामुळे या औषधाची आम्ही मागणी केली आहे. आमच्या मागणीचा भारत सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले.

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं औषध वा लस तयार झाली नाही. मात्र अमेरिकेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर करुन कोरोनाचे रुग्ण बरे केले जात आहेत. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. सोमवारी सकाळपर्यंत याठिकाणी ३ लाख ३७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने भारताकडे मदत मागितली आहे.

अमेरिकेने ज्या औषधाची मागणी केली आहे. त्याच्या निर्यातीवर भारताने निर्बंध आणले आहेत. २५ मार्च २०२० रोजी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने या औषधावर निर्बंध आणण्याबाबत परिपत्रक काढलं आहे. विशेष परिस्थितीत या औषधाची निर्यात करु शकण्याची परवानगी आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड भारताच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत येते. २५ मार्चच्या परिपत्रात ४ एप्रिल रोजी पुन्हा डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने बदल केले आहेत. नवीन परिपत्रकानुसार आता या औषधाच्या निर्यातीवर पूर्णत: निर्बंध लावण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे औषध बाहेर पाठवलं जाणार नाही.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर अमेरिकेला मदत करायची असेल तर कॅबिनेटच्या परवानगीशिवाय निर्णय घेऊ शकत नाहीत. भारतात या औषधाचा वापर आर्थेराइटिस, मलेरिया आणि ल्यूपस या आजारांवर उपचारासाठी केला जातो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर फक्त हॉस्पिटल कर्मचारी करु शकतात जे कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करत आहे. तसेच ज्यांच्या घरात कोरोना संक्रमित रुग्ण आहे त्याची सेवा करणारा व्यक्ती या औषधाचा वापर करु शकतो असं सांगितलं आहे.

भारतात हे औषध पाच कंपन्या उत्पादित करतात. सिपला, आयपीसीए, वॉलेस आणि Zydus Cadila या कंपन्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध उत्पादन करतात. सरकारला जितक्या औषधाची गरज आहे तितकचं उत्पादन करण्याची परवानगी या कंपन्यांना आहे.  

Web Title: Coronavirus: America President Donald Trump seeks help for India PM Narendra Modi pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.