Coronavirus: कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; जगातील पहिलीच ह्दयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 09:04 AM2020-03-29T09:04:26+5:302020-03-29T09:12:30+5:30
जीवघेण्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि नवजात बालकांना आहे. कारण ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे
वॉश्गिंटन – अमेरिकेत कोरोना व्हायरसचा धोका वेगाने वाढत असून चीनपेक्षाही अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांची संख्या १ लाख २३ हजारांहून अधिक पोहचली आहे. तर २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान अमेरिकेत एका ह्दयद्रावक घटना घडली आहे. जागतिक महामारी कोरोनामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती इलिनॉयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जीवघेण्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि नवजात बालकांना आहे. कारण ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशांच्या जीवाला कोरोनामुळे धोका पोहचतो. मात्र आतापर्यंत कोरोनामुळे लहान मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी नव्हती. पण गर्वनर जेबी प्रित्झकरने सांगितले की, मागील २४ तासात कोरोना व्हायरसमुळे मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले होते. हा पहिला लहान मुलाचा मृत्यू आहे. या मुलाला कोरोनाची लागण कशी झाली याची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील आठवड्यात पॅरिस येथील इले-डी फ्रांस परिसरात १६ वर्षीय युवतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनामुळे युवकांचा धोका कमी आहे असं सांगितलं जात होतं. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने तिचा मृत्यू झाला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. स्वत:चे संरक्षण आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर पडू नका असं वारंवार सांगितले जात आहे असं इलिनॉयचे राज्यपाल जे बी प्रित्झकर यांनी सांगितले.
जगातील सुमारे देशांत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या शनिवारी ६ लाखांच्या वर गेली असून आतापर्यंत ३० हजार ८७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख, ३७ हजार रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत आणि ४ लाख, ५९ हजार जणांवर अद्यापही विविध देशांमध्ये उपचार सुरू आहेत. अमेरिकेत या आजाराचे १ लाख २० हजार रुग्ण असून तेथील मृतांची संख्या २ हजारांच्या वर पोहचली आहे. एका दिवसांत तिथे सुमारे ९०० नवे रुग्ण आढळले.