CoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी बांगलादेशातील पोलिसांचा योगाभ्यास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:29 PM2020-06-17T23:29:24+5:302020-06-17T23:29:52+5:30
२४ जणांचा मृत्यू व ७,००० जणांना झाली लागण; यापूर्वी ३०० जणांनी घेतले प्रशिक्षण
ढाका : बांगलादेशातील पोलिसांनी आपले अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यास वर्ग सुरू केला आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तसेच त्यांना तणावमुक्त राखण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्टÑीय योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात येत असून, यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे बांगलादेशात तसेच सर्वत्र रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्याचे औचित्य आणखी वाढले आहे.
बांगलादेशात कोरोना संक्रमणामुळे २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे व ७,००० इतर सुरक्षा कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. चांसरी विभागाचे उपायुक्त अशरफुल इस्लाम यांनी म्हटले आहे की, ढाका महानगर पोलिसांच्या (डीएमपी) ३०० कर्मचाºयांनी यापूर्वीच योगाभ्यास केलेला आहे. आम्ही या सुरक्षा कर्मचाºयांसाठी ७ जून रोजीच योगाभ्यास वर्ग सुरू केलेला आहे.
सरकारी संवाद समिती बीएसएसने दिलेल्या वृत्तानुसार, अशरफुल यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाºयांचे मनोबल तसेच त्यांची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. डीएमपीच्या १,००० पोलीस कर्मचाºयांना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योगामुळे सुरक्षा कर्मचाºयांचे मानसिक आरोग्य तसेच त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे.
बांगलादेशातील अनेक पोलीस कर्मचारी स्वत: व त्यांचे कुटुंबीय कोरोनामुळे संक्रमित झाल्याच्या शंकेने त्रस्त आहेत. त्यातील अनेकांना झोप येत नाही व भूकही लागत नाही. मात्र, योगाभ्यासाने त्यांची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत मिळण्याबरोबरच त्यांना आनंदी राहून काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
पंतप्रधानांचे खाजगी आरोग्य सल्लागार डॉ. ए.बी.एम. अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, योगाभ्यासामुळे मानसिक शक्ती वाढण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हेच सर्वांत जास्त गरजेचे आहे. बांगलादेशात आतापर्यंत ९८,४८९ लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. त्यातील १,३०५ जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात योग दिनानिमित्त आॅनलाईन कार्यक्रम
२१ जून रोजी आंतरराष्टÑीय योग दिन साजरा करण्यात येत असून, यंदा कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे जगभरात सर्वत्र आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जगभरात योग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात; परंतु यंदा प्रत्येकाने आपापल्या घरातच राहून योगाभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या दूतावासातर्फेही यंदा आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.