Coronavirus: साथ पुन्हा येऊ नये, यासाठी दक्षता घ्या; जागतिक आरोग्य संघटनेची देशांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:09 PM2020-05-02T23:09:41+5:302020-05-03T06:44:20+5:30
चीनमधील वुहानमधून विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला. या विषाणूची कोणीही निर्मिती केली नसून तो निसर्गात पहिल्यापासून अस्तित्वात आहे,
जिनिव्हा : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घ्यावेत. तसेच ही साथ पुन्हा डोके वर काढणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने देशांना केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन स्थितीविषयक तज्ज्ञ डॉ. माईक रायन म्हणाले, संसर्गामुळे लादलेले निर्बंध मागे घेताना देशांनी खूप काळजी घेतली पाहिजे. या साथीचा पुन्हा फैलाव होणार नाही यासाठी सतत दक्ष राहिले पाहिजे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी फिजिक ल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या साथीच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना नीट उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्व देशांतील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहायला हवे.
चीनमधील वुहानमधून विषाणूचा संसर्ग जगभरात पसरला. या विषाणूची कोणीही निर्मिती केली नसून तो निसर्गात पहिल्यापासून अस्तित्वात आहे, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिका व मध्य पूर्वेतील काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. सुदान, दक्षिण सुदान, सिरिया, येमेन, अफगाणिस्तान या देशांचा त्यामध्ये समावेश आहे.
चीनचे कौतुक
कोरोना विषाणूचे उगमस्थान चीनमधील वुहानमध्ये गेल्या काही दिवसांत या साथीचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. या घटनेचे जागतिक आरोग्य संघटनेने स्वागत केले आहे. चीनमधील लोकांनी कोरोनाविरोधात जो अहोरात्र मुकाबला केला त्याचे हे फळ असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.