Omicron: ओमायक्राॅनचा मुकाबला करण्यासाठी बुस्टर गरजेचा; रिपोर्टमधून झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:23 AM2021-12-11T05:23:07+5:302021-12-11T05:23:28+5:30
ऑस्ट्रेलियात संशोधन : दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी बूस्टर
सिडनी : कोरोना विषाणूवरील लसीची दुसरी मात्रा घेऊन तुम्हाला सहा महिने झाले असतील तर आता पूरक मात्रा (बूस्टर डोस) घेण्याचा विचार करा. ही मात्रा तुम्हाला कोविडपासून अतिरिक्त संरक्षण देईल. विशेष म्हणजे विषाणूचे नवे रूप ओमायक्रॉनपासूनही या मात्रेमुळे संरक्षण मिळणार आहे. ऑस्ट्रेलियात एका अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. प्रारंभिक आकडेवारीतून हे समजते की, फायझर बूस्टर ओमायक्रॉनपासून संरक्षण देऊ शकतो. लसीच्या दोन मात्रांनी कोरोनापासून जसे संरक्षण दिले होते, तीच भूमिका पूरक मात्रा पार पाडेल.
जेव्हा तुम्ही कोविड लसीची पहिली मात्रा घेता, तेव्हा तुमचे शरीर स्पाइक प्रोटिन नावाच्या विषाणूच्या एका भागाविरोधात प्रतिकारशक्ती उत्पन्न करतो. त्या परिस्थितीत जर तुम्ही सार्स-कोव-२ विषाणूच्या संपर्कात असाल तर तुमची प्रतिकार व्यवस्था विषाणूला लवकर ओळखू शकते व त्याला प्रतिकार करू शकते. कोविड लसीच्या एका मात्रेसाठी प्रतिकार प्रतिक्रिया सामान्यत: अल्पकालीन असते. एका खंबीर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या प्रतिक्रियेसाठी लसीची दुसरी मात्रा आवश्यक असते. वय वाढते तसे आपल्या शरीरात अँटीबॉडीचे प्रमाण कमी होत जाते. तिला कमकुवत प्रतिकार क्षमता समजले जाते.
कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी अँटीबॉडी कमी होत जाते. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांनी कोविड संक्रमणाविरोधात लसीची प्रतिकारक्षमता सरासरी १८.५ टक्के कमी होत जाते.
संसदेच्या समितीची महत्त्वाची शिफारस
संसदेच्या एका समितीने आरोग्य मंत्रालयाला वेगवेगळ्या संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरूपांना तोंड देण्यासाठी कोरोनाविरोधी लसीच्या पूरक मात्रेची किती गरज आहे, याचा शोध लावला पाहिजे, असे सुचविले आहे. संसदेच्या स्थायी समितीने शुक्रवारी राज्यसभेत सादर केलेल्या आपल्या अहवालात रुग्णालयात खाटांचा कमाल दर निश्चित करणे, चिकित्सा कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करणे, बूस्टर मात्रेची आवश्यकता आकलन करण्याचीही शिफारस केली आहे.
कोरोनाचे ८,५०३ रुग्ण, ६२४ मृत्यू
शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ८,५०३ रुग्ण आढळले तर ६२४ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांची संख्या ४,७४,७३५ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ९४,९४३ आहे. गेल्या सलग ४३ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या १५ हजारांच्या आत राहिली. तर गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांमध्ये २०१ ची वाढ झाली.
अनिवासी भारतीयाची पत्नी, नातेवाईकालाही ओमायक्रॉन
जामनगर (गुजरात) : एक आठवड्यापूर्वी ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळलेल्या एका अनिवासी भारतीय व्यक्तीची पत्नी आणि त्यांच्या एका नातेवाईकालाही या नवीन विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.