CoronaVirus: कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालयं उभारू द्या; चीनची भारताला ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 03:54 PM2020-03-30T15:54:39+5:302020-03-30T15:56:24+5:30

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी चीनकडून भारताला मदतीची ऑफर

coronavirus china offers to build makeshift COVID 19 hospitals in India kkg | CoronaVirus: कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालयं उभारू द्या; चीनची भारताला ऑफर

CoronaVirus: कोरोनाचा सामना करण्यासाठी रुग्णालयं उभारू द्या; चीनची भारताला ऑफर

Next

बीजिंग: कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव चीननं दिला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पोहोचला. वुहानमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी चीननं अतिशय वेगवान पद्धतीनं मेकशिफ्ट रुग्णालय उभारलं होतं. तशाच प्रकारची रुग्णालयं भारतात उभारू शकतो, असं चीननं म्हटलंय. यासाठी चीन सरकारनं केंद्र सरकारशी संपर्कदेखील साधलाय.

जगात सात लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ३४ हजार जणांनी जीव गमावलाय. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असल्यानं चीननं भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्याचा प्रस्ताव दिलाय. चीन सरकारच्या 'ग्लोबल टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, चिनी कंपन्या भारतात मेकशिफ्ट रुग्णालयं उभारण्यासाठी मदत करू शकतात. मात्र चीन खरंच भारताची मदत करू पाहतोय की या मदतीच्या आडून वेगळंच काही करू पाहतोय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

'चीनच्या काही कंपन्या भारतात आधीपासूनच कार्यरत आहेत. स्थानिकांना औषध पुरवठा करण्यासोबतच मेकशिफ्ट रुग्णालयं तयार करण्याचं कामदेखील या कंपन्या करू शकतात. वुहानमध्येही अशाच प्रकारच्या रुग्णालयांची उभारण्यात आली होती,' असं ग्लोबल टाईम्सनं एका लेखात म्हटलंय. चिनी कंपन्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास सुरुवात केल्याचं दिल्लीतल्या चीनच्या दुतावासातले प्रवक्ते जी रोंग यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. 

कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनचे हे औदार्य भेसळयुक्त असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे कंबरडे मोडलेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या मदतीमागील हेतूबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

चीनने पाठवलेले टेस्टिंग किट हे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर स्पेन आणि झेक प्रजासत्ताक या देशांनी चिनी टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कोरोना विषाणूने युरोपमध्ये थैमान घातलंय. कोरोनामुळे इटलीत 10 हजाराहून अधिक तर, स्पेनमध्ये 6 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या संकटामुळे युरोपियन आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून यूरोपीयन देशांना मदतीचा हात पुढे केलाय. मात्र निकृष्ट टेस्टिंग किटमुळे चीनच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालाय.
 

Web Title: coronavirus china offers to build makeshift COVID 19 hospitals in India kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.