CoronaVirus: अवघे जग व्हेंटिलेटरवर ठेवून चीनमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 07:22 PM2020-03-27T19:22:50+5:302020-03-27T19:50:00+5:30
चीनमध्ये वातावरण निवळत असताना आता जगाला कोरोनाने ग्रासले आहे. भारतामध्ये ९००० सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत.
बिजिंग : चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात आल्यानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे चीनमधील जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहेही सुरु करण्यात येत आहेत. चीनचे मुख्य शहर शांघायमध्ये २०० हून अधिक थिएटर्स उघडण्यात येत आहेत.
चीनमधील अन्य भागातील 700 थिएटर्स उघडण्यात आली असून तेथे ब्लॉकबस्टर सिनेमांच्या तिकिटावर मोठी सूट सरकरानेच देऊ केली आहे. या सर्व चित्रपटगृहांमध्ये जुने ब्लॉकबस्टर सिनेमे दाखविण्यात येणार आहेत.
शांघाय प्रशासनाने थिएटर उघडण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश करताना शरीराचे तापमान तपासावे लागणार आहे. तसेच दोन जागांमधील अंत देखील कमीतकमी १ मीटर ठेवायचे आहे.
चीनमध्ये वातावरण निवळत असताना आता जगाला कोरोनाने ग्रासले आहे. भारतामध्ये ९००० सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. पीव्हीआर सिनेमाचे कार्यकारी अध्यक्ष कमल ज्ञानचंदानी यांनी सांगितले की आम्ही लॉकडाऊनचे समर्थन करतो. देशभरात पीव्हीआरच्या ८५४ स्क्रीन आहेत. याशिवाय भारतात डिस्ने चॅनलने व्हिडिओ ऑन डिमांडच्या धर्तीवरील डिस्ने प्लसचे लाँचिंग पुढे ढकलले आहे.