CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं वाढवलं चीनचं टेन्शन, धास्तावलेल्या ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:11 PM2021-08-04T18:11:20+5:302021-08-04T18:17:26+5:30
CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेने चीनमध्ये कहर केला आहे. यामुळे भयभीत झालेल्या चीनने आता अल्पवयीनांनाही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन आठवड्यांत चीनच्या सुमारे 18 प्रांतांमधून 450 नवे रुग्ण समोर आले आहेत. एक काळ होता जेव्हा चीनमध्ये कोरोना रुग्ण जवळजवळ संपले होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळू लागल्याने चिंता वाढली आहे. यामुळे चीनने पुन्हा एकदा अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लादले आहेत आणि कोट्यवधी लोक लॉकडाऊनमध्ये गेले आहेत.
चीनमध्ये बुधवारी एका दिवसात 71 नवे रुग्ण आढळून आले. या वर्षात जानेवारीनंतरची ही चीनमधील सर्वाधिक संख्या आहे. पूर्व चीनच्या नानजिंग शहरापासून कोरोनाची ही नवी लाट सुरू झाली आहे. आता पुन्हा बीजिंग ते वुहानपर्यंत कोरोना रुग्ण समोर येऊ लागले आहेत.
Corona Virus: कामाची बातमी! लसीनंतर आता येतेय 'अँटीव्हायरल गोळी'; जाणून घ्या, कोरोनावर किती प्रभावी
वुहान शहर हे जगातील कोरोना संसर्गाचा बालेकिल्ला मानले जाते. वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा संसर्ग जगभर पसरला, अशीही एक थेअरी आहे. असे म्हटले जाते की 2019च्या शेवटच्या महिन्यांत येथून कोरोनाची सुरुवात झाली.
12 ते 17 वर्षे वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम -
दरम्यान, चीनने या संकटाचा सामना करण्यासाठी नानजिंग, झेंग्झौ आणि वुहानच्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करायचे ठरविले आहे. कोरोना चाचणीची ही चौथी फेरी सुरू आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे म्हणणे आहे, की यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होईल. चीनच्या शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात, 12 ते 17 वर्षे वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम आता देशभरात राबवली जावी, असे म्हटले आहे. चिनी माध्यमांनुसार, 12 ते 17 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.