Coronavirus : एप्रिलच्या अखेरीस चीनवर पुन्हा होणार कोरोनाचा हल्ला; वैज्ञानिकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:57 PM2020-04-01T12:57:33+5:302020-04-01T12:59:27+5:30
चीनला देखील आपल्या इतर प्रांतात आतापासूनच कोरोना टेस्ट घेणे सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात येईल. ही तयारी कोरोनाच्या दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवू शकते, असही काउलिंग यांनी सांगितले.
नवी दिल्ली - कोरोनाचा उगम झालेल्या चीनमध्ये विस्कळीत झालेली स्थिती सामान्य होत आहे. कोरोनाचा थैमान देखील काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे 8 एप्रिल रोजी येथील लॉकडाउन हटविण्यात येणार आहे. त्याआधीच लोक बाहेर पडत आहे. तब्बल ६० दिवसांनंतर प्रतिबंध शिथील झाले आहे. मात्र चीनसमोर कोरोनाचे संकट पुन्हा येणार असल्याचा इशारा येथील वैज्ञानिकांनी दिला आहे.
कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा हल्ला होण्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. ‘नेचर’ मासिकाने हाँगकाँग विद्यापीठातील महामारी तज्ज्ञ बेल काउलिंग यांच्या हवाल्याने लिहिले की, सध्याचा कालावधी लॉकडाउनपासून मुक्ती मिळवून थोडा आराम करण्यासाठी आहे. मात्र कोरोना व्हायरसचा देशावर पुन्हा एकदा हल्ला होणार हे निश्चित आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोरोना पुन्हा परतणार याची खात्री काउलिंग यांनी व्यक्त केली.
बेन काउलिंग म्हणाले की, कोरोना व्हायरस हुबई प्रांतातून संपूर्ण चीनसह युरोपातील देशात पसरला आहे. संपूर्ण जगात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. सीमा बंद करण्यात आल्या आहेत. युरोपात कोरोना रुग्णांवर होत असलेल्या उपचारांकडे पाहून असं दिसत की, त्यांना कोरोना रुग्णांना इतरांपासून दोन वर्षे वेगळ ठेवावे लागेल. तरच त्याच्या देशातील लोक वाचू शकतील.
चीनला देखील आपल्या इतर प्रांतात आतापासूनच कोरोना टेस्ट घेणे सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात येईल. ही तयारी कोरोनाच्या दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवू शकते, असही काउलिंग यांनी सांगितले.
चीनमध्ये जीवन सामान्य होत आहे. मात्र या कालावधीत कोरोनाची लक्षणे दिसत नसलेले लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. अस झाल्यास कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा दुसरा हल्ला पुढील दोन आठवड्यानंतर होण्याची दाट शक्यता हाँगकाँग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ गॅब्रियल लिउंग यांनी व्यक्त केली आहे.