coronavirus : जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला, सात ठिकाणी आणीबाणी घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:29 PM2020-04-07T16:29:28+5:302020-04-07T16:34:07+5:30
टोकियो आणि ओसाका शहरात कोरोनाचा होत असलेल्या फैलाव विचारात घेऊन यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती.
टोकियो - चीनपासून जवळ असूनही गेल्या काही महिन्यांपासून जपान कोरोना विषाणूच्या प्रकोपापासून बचावला होता. मात्र आता जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शिंजो आबे यांनी आज देशातील टोकियो आणि ओसाकासह अन्य पाच प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे.
देशात अशी परिस्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे लोकांचे जीवन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे, असे शिंजो आबे यांनी आणीबाणीची घोषणा करताना सांगितले. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर आता देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, टोकियो आणि ओसाका शहरात कोरोनाचा होत असलेल्या फैलाव विचारात घेऊन यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आबे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावून आणीबाणीबाबत चर्चा केली.
जपानमधील आणीबाणी आज रात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सात प्रांतातील गव्हर्नरांना विशेषाधिकार मिळतील. त्यानुसार ते लोकांना घरात राहण्याचे तसेच, उद्योगधंदे बंद करण्याचे आदेश देऊ शकतील. जपानमधील ज्या भागात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये सैतमा, कांगवा, चीबा, हयोगो आणि फुकुओका या भागांचा समावेश आहे. जपानमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो अशी भीती जपानी सरकारला वाटत आहे. त्यामुळेच देशात आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे.