हम नही सुधरेंगे... चीनने मदत म्हणून पाठवलेली कोरोना टेस्टिंग किट निकृष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 11:02 AM2020-03-30T11:02:48+5:302020-03-30T11:15:15+5:30
चीनकडून जगभरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ?
माद्रिद - चीनमधून उगम पावलेला कोरोना विषाणू सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनचे हे औदार्य भेसळयुक्त असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे कंबरडे मोडलेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या मदतीमागील हेतुबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.
दरम्यान, चीनने पाठवलेले टेस्टिंग किट हे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर स्पेन आणि झेक प्रजासत्ताक या देशांनी चिनी टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना विषाणूने युरोपमध्ये थैमान घातले आहे. कोरोनामुळे इटलीत 10 हजाराहून अधिक तर, स्पेनमध्ये 6 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या संकटामुळे युरोपियन आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनकडून यूरोपीयन देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र निकृष्ट टेस्टिंग किटमुळे चीनच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.
या टेस्टिंग किटची थेट चीनमधून आयात करण्यात आली नसल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. या किटची खरेदी स्पेनमधीलच एका पुरवठादरकडून खरेदी केले होते. हे किट या पुरवठादाराने चीनमधील एका कंपनीकडून आयात केले होते. दरम्यान, यूरोपीय महासंघाचे कडक निकष असताना या किट आल्या कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.