Coronavirus: कोरोना व्हायरसचा चौथ्या टप्प्यात शिरकाव; मृतांचा आकडा दुपटीने वाढण्याची WHO ला भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 12:22 PM2020-04-02T12:22:21+5:302020-04-02T12:26:36+5:30
याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
जेनेवा – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील १८० पेक्षा जास्त देशांना विळख्यात घेतलं आहे. काही दिवसात जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक होणार असून या महामारीत मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या वर पोहचणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे.अशातच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढणार आहे. कोरोनाचा वाढता आकडा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनणार आहे. मागील ५ आठवड्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली असल्याचं त्यांनी सांगितले.
WHO च्या आकडेवारीनुसार जगातील २०० देशांमध्ये ४० हजारांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये 3,312, अमेरिकेत 5,110, स्पेनमध्ये 9,387, इराणमध्ये 3,036, फ्रान्समध्ये 4,032, जर्मनीमध्ये 931 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1900 हून अधिक झाली आहे. तर दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा दोन लाखांहून अधिक झाला आहे.
अमेरिकेचे 9/11च्या हल्ल्यापेक्षाही मोठे नुकसान
कोरोना व्हायरसपुढे महास्ता म्हणवला जाणारा अमेरिकाही पुरता हतबल झाला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. या आकड्याने अमेरिकेवर 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. 2001मध्ये झालेल्या या हल्लात जवळपास ३ हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. येथील 190,000 हून अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत.