coronavirus : WHOच्या या चुकीमुळे पसरला कोरोना, प्रमुखांवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:59 PM2020-04-07T12:59:13+5:302020-04-07T13:09:01+5:30
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेतील अनेक नेते जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) दोषी ठरवत आहेत.
जिनेव्हा - कोरोना विषाणूचा जगभरातील फैलाव चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेतील अनेक नेते जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) दोषी ठरवत आहेत. तसेच संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहेनम घेब्रियेसूस यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असून, येथील मृतांचा आकडा 10 हजारांच्या वर पोहोचला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, तसेच कम्युनिस्ट चीनने दिलेल्या महितीवर ज्या पद्धतीने विश्वास ठेवला. त्यावर अमेरिकन राजकारण्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, चीनने कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप अनेक पाश्चिमात्य संशोधकांनी केला आहे.
दरम्यान, कोरोनासारख्या अपत्तीवेळी चीनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने जागतिक आरोग्य संघटनेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. कोरोनाच्याबाबतीत चीनकडून पुरेसा पारदर्शकपणा दाखवला गेला नाही, त्यासाठी काही प्रमाणावर जागतिक आरोग्य संघटना जबाबदार आहे, असा आरोप अमेरिकेतील रिपब्लीकन सिनेटर मार्था मॅकसेली यांनी केला आहे.
आपण कधीही कुठल्याही कम्युनिस्टावर विश्वास ठेवला नाही. चीन सरकारने आपल्या देशात तयार झालेल्या कोरोना विषाणूची बाब लपवली. त्यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये अनेक जणांना अनावश्यक आपला जीव गमवावा लागला, या बाबीकडे कानाडोळा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनाही जबाबदार आहे, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मॅकसेली यांनी केली.
55 वर्षीय टेड्रोस हे इथिओपियाचे रहिवासी आहेत. या टेड्रोस यांनी संपूर्ण जगाला फसवले असल्याचा आरोप मॅकसेली यांनी केला आहे. टेड्रोस यांनी कोरोना विषाणूविरोधात चीनने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले होते.