coronavirus: भारत, अमेरिकेत कोरोना सुसाट, पण या देशाने संसर्गाला आणले पूर्णपणे नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 06:08 PM2020-08-10T18:08:08+5:302020-08-10T18:10:42+5:30
न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भेटला होता. तर १ मे रोजी देशातील समूह संसर्गातून बाधा झालेला शेवटचा रुग्ण सापडला होता. दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत देशात समूह संसर्गाची एकही घटना घडलेली नाही.
नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी एकदम कमी दिसून येत आहे. एकीकडे भारत आणि अमेरिकेसारख्या देशाता कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनलेली आहे. मात्र काही देशांनी कोरोनाच्या या साथीवर मोठ्या शिताफीने नियंत्रण मिळवले आहे. या देशांपैकीच एक देश आहे तो म्हणजे न्यूझीलंड.
न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण भेटला होता. तर १ मे रोजी देशातील समूह संसर्गातून बाधा झालेला शेवटचा रुग्ण सापडला होता. दरम्यान तेव्हापासून आतापर्यंत देशात समूह संसर्गाची एकही घटना घडलेली नाही. तसेच समूह संसर्गाविना देशाने १०० दिवसदेखील पूर्ण केले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी न्यूझीलंडने तीन प्रकारचे उपाय केल्याचे समोर आले आहे. या उपाययोजना पुढीलप्रमाणे.
१ - कोरोनाचा देशात प्रवेश होऊ नये यासाठी देशा्च्या सीमांवर नियंत्रण.
२ - समूह संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टंसिंगची चोख अंमलबजावणी
३ - कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या घेण्यावर भर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारेंटाइनचा प्रभावी वापर
वरीलप्रमाणे सामूहिक उपाय अवलंबून युरोप आणि उत्तर अमेरिकेतील श्रीमंत देशांपेक्षा कोरोनाची रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे न्यूझीलंडने सांगितले. न्यूझीलंडने स्पष्टपणे ही रणनीती अपेक्षेहून लवकर अवलंबली आणि आक्रमक पद्धतीने त्याचे पालन केले. तसेच सुनियोजित पद्धतीने केलेले लॉकडाऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रभावी ठरले.
मात्र भारतात नेमकी याउलट परिस्थिती आहे. २४ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला आता १३६ दिवस उलटत आले आहेत. या काळात अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू खुले केले जात आहेत. मात्र यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या बेसुमार पद्धतीने वाढत आहे.