Coronavirus :"आता कोरोना कधीच संपणार नाही, त्याच्यापासून मुक्तताही मिळणार नाही", न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे हतबल उदगार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:09 PM2021-10-04T16:09:54+5:302021-10-04T16:21:32+5:30
Coronavirus Update: कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही.
वेलिंग्टन - कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. (Coronavirus Update) दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कोरोनाबाबत एक मोठे विधान केले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन (Jacinda Ardern) यांनी कोरोनाच्या जागतिक साथीपासून पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही, हे मान्य केले आहे. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी ऑकलंडमध्ये लॉकडाऊन संबंधीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देतानासांगितले की, या साथीच्या सुरुवातीला न्यूझीलंडने कडक लॉकडाऊन लागू करत अन्य कठोर उपाय योजून कोरोनाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या म्हणाल्या की, आतापर्यंत न्यूझीलंडची ही रणनीती ५० लाख लोकसंख्या असलेल्या देशासाठी उपयुक्त ठरली होती. देशामध्ये संसर्गामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान जेसिंडा यांनी सांगितले की, जेव्हा इतर देशांमध्ये मृतांची संख्या वाढत होती आणि लोकांचे दैनंदिन जीवन बाधित झाले होते. तेव्हा न्यूझीलंडमधील जनता आपल्या कार्यालयात, शाळांमध्ये आणि खेळांच्या मैदानात सर्वसामान्यपणे जात होते. मात्र ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका व्यक्तीच्या डेल्टा व्हेरिएंट विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर पूर्ण चित्र बदलले. त्यांनी सांगितले की, देशामध्ये हा रुग्ण सापडल्यानंतर कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र हा संसर्गाला रोखण्यासाठी पुरेसा नव्हता. देशामध्ये सोमवारी संसर्गाचे २९ नवे रुग्ण सापडल्यानंतर बाधितांची संख्या वाढून १३०० पेक्षा अधिक झाली आहे. काही रुग्ण ऑकलंडच्या बाहेरही सापडले आहेत. मात्र ऑकडंलमध्ये लागू करण्यात आलेल्या सात आठवड्यांच्या निर्बंधांमुळे संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळाली आहे.
त्यांनी सांगितले की, या संसर्गाबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे दीर्घकाळ कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्ण सापडणे थांबलेले नाही. मात्र संसर्ग पूर्णपणे रोखणे महत्त्वपूर्ण होते. कारण तेव्हा आमच्याकडे लस नव्हती. मात्र आता आमच्याकडे लस आहे. आता आपण रणनीती बदलू शकतो.