Coronavirus: कोरोनाच्या काळात चीननं दाखवली ताकद; अमेरिकेनं शक्तिप्रदर्शन करत दिला कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:39 AM2020-04-16T09:39:48+5:302020-04-16T09:50:30+5:30
अमेरिकेच्या हवाई दल आणि नौदलाने जपानला लागून असलेल्या गुआम एअरबेसवरही शक्तिप्रदर्शन केले आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या काळातच तैवान आणि जपानच्या समुद्राजवळ विमानवाहक युद्धनौका पाठवून शक्तिप्रदर्शन करणाऱ्या चीनला अमेरिकेनं आपली ताकद दाखवली आहे. आता अमेरिकेच्या हवाई दल आणि नौदलाने जपानला लागून असलेल्या गुआम एअरबेसवरही शक्तिप्रदर्शन केले आहे. यूएस एअरफोर्सचे बॉम्बर, प्राणघातक ड्रोन एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं युद्धसराव केला असून, गुआम एअरबेसवर अमेरिकेचं सैन्य 'एलिफंट वॉक' करताना दिसले. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून अमेरिकेने चीनला कडक इशारा दिला आहे.
जाणून घ्या, एअरफोर्सचा 'एलिफंट वॉक' म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या हवाई दलाला हे कळले की शत्रू देश हल्ला करणार आहे, तेव्हा हवाई दल आपले लढाऊ विमान अशा स्वरूपात बनवते की ते फारच कमी वेळात आक्रमण करण्यास सक्षम असतात. या निर्मितीस एलिफंट वॉक असे म्हटले जाते. सोमवारी, यूएस एअरफोर्स आणि नेव्ही यांनी गुआममधील त्यांच्या अँडरसन एअरफोर्स तळावर डझनभर विमानांसह प्रदर्शन केले.
अमेरिकन एअरबेसच्या नाकाखाली चीनचा अड्डा
गुआम हवाई तळ हे पूर्व चीनपासून 1800 मैलांवर आहे. अमेरिकेने येथे आरक्यू ग्लोबल हॉक ड्रोन, पाच बी -52 बॉम्बर विमानं आणि हवाई टँकरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं आहे. यापूर्वी चीनने तैवानच्या जवळच आपली विमानं आणि युद्धनौका पाठवून तैवानला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनची विमानवाहक युद्धनौका लियोनिंग आणि अन्य 5 युद्धनौका प्रथम जपानला लागून असलेल्या मियाको स्ट्रॅटमधून गेल्या आणि नंतर तैवानजवळही आल्या होत्या.
तैवानजवळ चीनचा युद्धसराव
तैवानजवळून जात असताना चिनी सैनिकांनी युद्धसराव केला आहे. चीनने आपल्या या हालचालीने तैवानला धमकावण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा आहे. प्रशांत महासागरात कार्यरत अमेरिकेच्या दोन यूएस नेव्ही विमान वाहक युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रिगन आणि यूएसएस रुझवेल्ट या कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर चीननं हे पाऊल उचललं आहे. यामुळे संपूर्ण प्रशांत महासागरात चीनला मोठी संधी मिळते आहे. याचा फायदा घेऊन चीन इतर देशांना चिथावणी देत आहे.
अमेरिकेच्या 600 नौदलाच्या सैनिकांना कोरोनाची बाधा
अमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस रुझवेल्टवरचे 600 नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. इतकेच नाही तर सोमवारी एका नौसैनिकाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यूएसएस रेगन जहाज सध्या जपानच्या योकोसुका येथे आहे आणि त्याची डागडुजी सुरू आहे. तथापि, त्याचे क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. नुकतीच अमेरिकन सैन्य तैवानजवळ समुद्रावरही सक्रिय होती. शुक्रवारी अमेरिकेच्या नौदलाचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक तैवानमार्गे गेले. त्याच दिवशी चीनची लढाऊ विमानाने तैवानजवळ सराव करत होती.