CoronaVirus: कोरोनाग्रस्त रुग्णांवर भलतंच संकट; शरीरात रक्त गोठत असल्यानं डॉक्टरसुद्धा झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:27 PM2020-04-24T21:27:56+5:302020-04-24T21:47:21+5:30
व्हायरसमुळे कोरोना रुग्णांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका आहे.
न्यूयॉर्क: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, अनेक नवी माहिती समोर येऊ लागली आहे. कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्त गोठत असल्याची नवीच माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील नेफरोलॉजिस्टना असे आढळले आहे की, व्हायरसमुळे कोरोना रुग्णांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना हृदयविकार येणाऱ्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
माउंट सिनाई हॉस्पिटलचे डॉक्टर जे. पी. मोक्कोनी सांगितले की, हा रोग रक्त कसे गोठवतो हे आश्चर्यचकीत करणारे आहे. अनेक कोरोनाग्रस्त तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मार्चच्याच तीन आठवड्यांत डॉक्टर मोक्को यांनी मेंदूत रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका आलेले 32 रुग्ण पाहिल्याचं डॉक्टर जे. पी. मोक्कोंनी सांगितलं आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, 32पैकी निम्म्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.
दुसरीकडे विलगीकरण कक्षात राहून बरं झालेल्या रुग्णाला 70 दिवसांनी कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये चिंता वाढली आहे. एकेकाळी कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये एका 50 वर्षाच्या माणसाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्याला सुरुवातीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तो बरा झाला असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
विशेष म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आला, तेव्हा त्यानं चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. या व्यक्तीला कोरोना संसर्गातून बरे होऊन दोन महिने उलटले आहेत. चीनमध्ये अशा प्रकारची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, तर काही रुग्ण 50 किंवा 60 दिवसांनी पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्याचंही आढळलं आहे.