Coronavirus: चीनमध्ये कोरोनामुळे भयंकर स्थिती, दोन वर्षांनंतर सर्व ३१ प्रांतात फैलाव, ५ शहरात पूर्ण लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 11:05 AM2022-03-31T11:05:48+5:302022-03-31T11:06:20+5:30
Coronavirus In China: कोरोनामुळे चीनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दोव वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चीनने अमलात आणलेली झीरो कोविड पॉलिसीही कुचकामी ठरताना दिसत आहे.
बीजिंग - कोरोनामुळे चीनमध्ये भयंकर परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दोव वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनमधील सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चीनने अमलात आणलेली झीरो कोविड पॉलिसीही कुचकामी ठरताना दिसत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे बाधित झालेल्यांचा आकडा ६२ हजारांच्या पुढे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत चीनच्या आर्थिक राजधानी शांघाईसह पाच मोठ्या शहरांत लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
चीनमधील सुमारे १२ हजार सरकारी रुग्णालये रुग्णांमुळे भरली असून, नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी येथे जागा उरलेली नाही. चीनने कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, एक सक्त नियम तयार केला होता. त्यानुसार एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात येत असे. त्यामुळे चीनच्या वैद्यकीय चौकटीवर खूप परिणाम झाला आहे.
चीनचे मोठे व्यावसायिक केंद्र असलेल्या शांघाईमध्ये पुढच्या शुक्रवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बँकिंग आणि इतर व्यवहार बाधित होऊ नये, यासाठी शांघाईतील सुमारे २० हजार बँकर्स ऑफिसमध्येच राहत आहेत. सरकारकडून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चीन जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला देश आहे. चीनमध्ये ८८ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचे दोन डोस दिले हेले आहे. मात्र तरीही चीनमधील वयस्कर म्हणजे ६० वर्षांवरील लोकांमधील केवळ ५२ नागरिकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत.
दरम्यान, आयसीएमआरचे तज्ज्ञ डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी सांगितले की, विषाणूचं जेवढं म्युटेशन होतं, धोका तेवढाच वाढत जातो. चीनमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक हा भारतासाठीही धोका वाढवणारा आहे. त्यामुळे तेथील कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच चीन आणि इतर देशांमध्ये पसरत असलेल्या कोरोनामुळे भारताला असलेल्या धोक्याबाबत अनेत तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तसेच अनेकांनी भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे.