Corona Vaccine: कोरोना लसीकरणानंतर काही महिन्यातच अँन्टिबॉडीमध्ये होतेय घट?; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:44 PM2021-08-25T18:44:33+5:302021-08-25T18:48:08+5:30
लसीकरण आजही कोरोनासारख्या गंभीर आजाराविरोधात विशेषत: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध सुरक्षा देत आहेत.
लंडन – कोविड १९ विरुद्ध फायजर, बायाटेक आणि ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर मिळालेली सुरक्षा कालांतराने घटत असल्याचं समोर आले आहे. बुधवारी ब्रिटनमध्ये जारी केलेल्या रिपोर्टनुसार, फायजर, बायोटेकच्या दोन्ही डोसनंतर शरीरात तयार झालेल्या अँन्टिबॉडीज ५ महिन्यात ८८ टक्क्यावरुन सहाव्या महिन्यात ७४ टक्के शिल्लक राहत आहेत.
भारतात कोविशील्डच्या अँन्टिबॉडीजमध्ये घट
भारतात ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविशील्डच्या नावानं लोकांना दिली जाते. ही लस घेणाऱ्यांमध्ये ४ महिन्यानंतर अँन्टिबॉडीज ७७ टक्क्याहून पाचव्या महिन्यात ६७ टक्के शिल्लक राहतात. रिपोर्टच्या या निष्कर्षावरुन ब्रिटनमधील सरकारनं सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटातील लोकांना बूस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. पुढील महिन्यापासून ब्रिटनमधील लोकांना बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे. जो कोविड स्टडीचे मुख्य वैज्ञानिक प्रोफेसर टीम स्पेक्टर म्हणाले की, "माझ्या मते, तार्किकदृष्ट्या सर्वात वाईट परिस्थिती हिवाळ्यापर्यंत वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अँन्टीबॉडीज ५० टक्क्यांच्या खाली येऊ शकतात असं त्यांनी सांगितले आहे.
डोस उशीरा घेण्याचं कुठलंही कारण नाही
परंतु प्रोफेसर यावर जास्त भर देत आहेत की, लसीकरण आजही कोरोनासारख्या गंभीर आजाराविरोधात विशेषत: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध सुरक्षा देत आहेत. लसीकरणानंतर मिळणारी अँन्टीबॉडीजमध्ये काही प्रमाणात घट होते परंतु लस न घेण्याचं कुठलंही कारण नाही. लसीकरण आजही डेल्टासह अन्य व्हेरिएंट्सवर सर्वाधिक सुरक्षा देतात. त्यामुळे आपल्याला जितकं शक्य आहे तितक्या जास्त प्रमाणात लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचसोबत बूस्टर डोसबाबत योजना आखणं महत्त्वाचं आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण करण्याची रणनीती आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यापर्यंत ही मोहीम सुरुच ठेवावी लागेल असंही ते म्हणाले.
डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायजर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी
अमेरिकी आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार फायजर आणि मॉडर्ना लसी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. यात दोन्ही लसींची प्रभावी क्षमता ९१ टक्क्यांवरुन घसरुन थेट ६६ टक्क्यांवर आली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडून (सीडीसी) या दोन लसीच्या वास्तविक स्वरुपात मानवी शरीरावर होत दिसून येत असलेल्या प्रभावाची चाचणी केली जात आहे. याच दोन लसींना सर्वात आधी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे अधिकृत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या दोन लसींचा डेल्टा व्हेरिअंटविरोधातील प्रभावी क्षमतेची चाचणी केली जात आहे.