CoronaVirus News: 'हे' एक छोटंसं काम कराल, तर कमी होईल कोरोनाचा धोका; संशोधनातून दावा
By कुणाल गवाणकर | Published: October 21, 2020 07:56 AM2020-10-21T07:56:45+5:302020-10-21T07:57:08+5:30
CoronaVirus News: अमेरिकेतल्या पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांचा अहवाल
वॉशिंग्टन: जगातील कोरोना बाधितांचा आकडा ४ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या सव्वा अकरा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचं, मास्क वापरण्याचं आणि वारंवार हात धुण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावरही भर दिला जात आहे. त्यातच आता काही माऊथवॉशमुळे कोरोना निष्क्रिय होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
माऊथवॉशमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकत असल्याची माहिती मेडिकल वायरॉलॉजीशी संबंधित मासिकात प्रसिद्ध झाली आहे. माऊथवॉशमधील काही घटक कोरोना विषाणूचं प्रमाण कमी करण्यास उपयोगी ठरू शकत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी अमेरिकेतल्या पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी माऊथवॉश आणि नेजोफेरिंजियल रिंजची तपासणी केली.
अनेक माऊथवॉशमध्ये कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचं पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलं. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीनं माऊथवॉशचा वापर केल्यास त्याच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो, असंदेखील संशोधन सांगतं.
जोपर्यंत आपल्याला कोरोनावरील लस मिळत नाही, तोपर्यंत आपण कोरोनाचा प्रसार रोखण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवं, असं पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर क्रेग मेयर्स यांनी म्हटलं. आम्ही परिक्षण केलेली उत्पादनं अतिशय सहजपणे उपलब्ध आहेत आणि लोक दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करू शकतात, असं मेयर्स यांनी सांगितलं.
हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती- संशोधन
कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहे. वायू प्रदूषण आणि धुक्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढेल. वायू प्रदूषण आणि धुक्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगानं होईल, असं संशोधन सांगतं. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. युरोपातल्या काही देशांमध्ये हिवाळ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली.