Coronavirus: कोरोनाला पुरून उरणारी लस तयार; भारताचा मित्र असलेल्या देशाच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:00 PM2020-05-05T12:00:58+5:302020-05-05T12:27:06+5:30
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील 24 तासांमध्ये 78377 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनासारख्या महामारीच्या उपचारासाठी अजूनही अधिकृत लसीचा शोध लागलेला नाही. मात्र इस्रायलमधील संशोधकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्यात यश आलं असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफताली बेनेट यांनी सोमवारी दावा केला की देशाच्या संरक्षण जैविक संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. ते म्हणाले की कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबॉडी तयार करण्यात संस्थेने मोठे यश संपादन केले आहे. तसेच कोरोना व्हायरस लसीला विकसित करण्याचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे संशोधक आता त्याच्या पेटंट आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची तयारी करत असल्याची माहिती नफताली बेनेट यांनी दिली आहे.
#BREAKING: Joint statement by the Israeli Ministery of Defense and the Israel Institute for Biological Research: A significant breakthrough has been achieved in finding an antidote to the Corona virus that attacks the virus and can neutralize it in the sick body
— Amichai Stein (@AmichaiStein1) May 4, 2020
नफताली बेनेट म्हणाले की, कोरोना व्हायरस लसीच्या विकासाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट आता ही लस पेटंट करण्याच्या विचारात आहे. पुढील टप्प्यात, संशोधक व्यावसायिक उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधतील.तसेच या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान असल्याचे देखील बेनेट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे इस्रायलमधील संशोधकांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण जगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इस्रायलचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारत इस्रायलकडून तंत्रज्ञान घेईल असं सांगण्यात येत आहे.