CoronaVirus News: बाजारात सहज मिळणारं 'ते' औषध ठरणार गुणकारी; कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 06:03 AM2020-06-17T06:03:50+5:302020-06-17T06:59:45+5:30
सहज उपलब्ध असलेले स्टेरॉईड गुणकारी
पॅरिस : बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले ‘डेक्झामेथॅसोन’ हे स्टेरॉइड ‘कोविड-१९’ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना दिल्यास मृत्यूचे प्रमाण एक तृतियांशाने कमी होते, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी अभ्यास पाहणीतून काढला आहे. जगभर हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात ही मोठी आशादायी बाब मानली जात आहे.
‘कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या दोन हजार रुग्णांना हे स्टेरॉइड देऊन केलेल्या या अभ्यास पाहणीचा निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आला. ज्यांना हे औषध दिले नाही अशा चार हजार रुग्णांचाही या चाचणीत तौलनिक अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता. त्यात आढळले की, ज्यांना श्वासही घेता येत नाही म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवले गेले होते, अशा कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले. ज्यांना आॅक्सिजन दिला जात होता, अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले.
या वैज्ञानिकांचे नेतृत्व ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनमधील साथीच्या रोगांविषयीचे प्रा. डॉ. पीटर हॉर्बी यांनी केले. ते म्हणाले की, यामुळे कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते असे ‘डेक्झामेथॅसोन’ हे पहिले औषध आहे. हा नवा शोध खूपच स्वागतार्ह आहे. हे स्टेरॉइड तुलनेने स्वस्त व औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणारे असल्याने कोविड रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठी त्याचा जगभर लगेच सहज वापर सुरू करता येईल. (वृत्तसंस्था)
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या कोरोना रुग्णांना दररोज ‘डेक्झामेथॅसोन’ हे स्टेरॉइड दिल्यास आठपैकी एका रुग्णाचा मृत्यू टाळता येतो, तर ज्यांना फक्त आॅक्सिजन दिला जात आहे अशा २५ पैकी एका रुग्णाचा जीव वाचविला जाऊ शकतो.