CoronaVirus आयर्न मॅन! अमेरिकेच्या पहिल्या रुग्णाला तपासणारा डॉक्टर कोमातून बाहेर; मृत्यू अटळ होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 11:44 AM2020-04-16T11:44:58+5:302020-04-16T11:45:54+5:30
रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रेयॉन यांचे उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना फोनवरून याची माहिती दिली होती.
सिएटल : सिएटलच्या किर्कलँड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या रेयॉन पडगेट यांनी व्यायामातून शरीरयष्टी कमावलेली आहे. यामुळे त्यांना आयर्न मॅन असे संबोधले जाते. मात्र, जेव्हा रेयॉनना कोरोनाने विळखा घातला तेव्हा त्यांना मृत्यूनेच कवटाळले होते. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनीही रेयॉन यांचे मरण पक्के असल्याचे म्हणत आशा सोडली होती. मात्र, रेयॉन यांनी मृत्यूला हुलकावणी दिली.
रेयॉन यांनीच अमेरिकेतील पहिल्या कोरोना रुग्णावर उपचार केले होते. ते ४५ वर्षांचे आहेत. रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रेयॉन यांचे उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना फोनवरून याची माहिती दिली होती. हा अमेरिकेतील पहिला मृत्यू होता. यानंतर किर्कलँड हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनले. येथील सर्वाधिक रुग्ण हे वृद्ध होते. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता. रेयॉन उपचार करत होते. मात्र, त्यांनी स्वत:चा विचार केला नाही.
मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या अचानक डोके आणि मांसपेशींमध्ये दुखू लागले. ही बाब साधी नव्हती. त्यांच्या होणाऱ्या पत्नीने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये जाऊया, पण त्यांनी यास नकार दिला. दोन दिवसांनंतर रेयॉन यांना वाटू लागले की आपल्याच हॉस्पिटलमध्ये रुग्ण बनणार आहे.
यानंतरचा प्रवास रेयॉन यांनी कथन केला आहे. १६ मार्चला हृदय, किडनी आणि फुफ्फुसाला त्रास जाणवू लागला. यानंतर कोमामध्ये गेलो. तेव्हा डॉ. मॅट हार्टमन आणि सॅम्युएल युसिफ यांनी माझ्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझी परिस्थिती पाहून मृत्यू अटळ असल्याचे पत्नीला सांगितले. पण शेवटचा प्रयत्न करून पाहू, जगले तर दुसऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी मदत मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी मला ईसीएमओवर ठेवले होते. ही मशीन एक कृत्रिम हृदय आणि फुफ्फुसाचे काम करते. याद्वारे शरीरातील रक्त आत-बाहेर केले जाते. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताप उतरला. २३ मार्चला मशीन हटविण्यात आली. २७ मार्चला कृत्रिम श्वासोच्छवास काढण्यात आला. यानंतर दोन आठवड्यांनी कोमातून बाहेर आलो. तेव्हा समजले की कोरोनामुळे साऱ्या जगाचे आयुष्यच बदलून टाकले आहे, असे रेयॉन यांनी सांगितले.