CoronaVirus: अत्यावश्यक वैद्यकीय साधनं नसल्यानं लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:10 AM2020-04-21T04:10:15+5:302020-04-21T04:10:30+5:30
गेल्याच आठवड्यात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला. आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.
पाकिस्तान
डॉक्टर उपोषणाला बसलेत आणि म्हणत आहेत की, तसंही आम्ही मरणारच आहोत तर उपोषणानं मरू, पण निदान आमचं म्हणणं ऐका!
लाहोर-पाकिस्तानमधलं हे चित्र आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. दुसरीकडे डॉक्टरांकडे काही साधनं नाहीत. पीपीई नाहीत. आवश्यक ती उपचार यंत्रणा नाही. ती द्या म्हटलं तर सरकार ऐकत नाही, गेल्याच आठवड्यात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला. आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. २४ तासांचं उपोषण होतं, ते वाढवू असं म्हणत या डॉक्टरांनी जनतेसमोर आपली बाजू ठेवणारा एक व्हिडिओ ठेवला. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मात्र, सरकारमधल्या एका मंत्र्यानं तर असंही विधान केलं की, डॉक्टर आता अडवणूक करीत आहेत. पगार वाढवून द्या म्हणून हे आंदोलन सुरू आहे, बाकी या उपोषणाला काहीच अर्थ नाही. मात्र, हे सारं खोटं आहे. आपण फक्त पीपीई, उत्तम साधनं, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनं
आणि या कोरोना लढाईत कुणी डॉक्टर दगावला (एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहेच.) तर त्याला ‘शहीद’ दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे, असं यंग डॉक्टर्स असोसिएशन ही डॉक्टरांची संस्था सांगते. एकीकडे आण्विक ताकद असल्याच्या गमजा दुसरीकडे देशात डॉक्टरांची ही गत, प्राधान्यक्रम चुकला शासनाचा की काय होतं, याचं हे विदारक चित्र आहे.