CoronaVirus: ...तर आम्ही कारवाई करू, जोरदार प्रत्युत्तर देऊ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:53 AM2020-04-07T08:53:46+5:302020-04-07T08:56:08+5:30

CoronaVirus: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरून ट्रम्प यांचा इशारा

Coronavirus Donald Trump Gave Signs If India Did Not Give Hydroxychloroquine Medicine Us will take action kkg | CoronaVirus: ...तर आम्ही कारवाई करू, जोरदार प्रत्युत्तर देऊ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

CoronaVirus: ...तर आम्ही कारवाई करू, जोरदार प्रत्युत्तर देऊ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

Next

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूनं चीन, युरोपनंतर आता अमेरिकेत धुमाकूळ घातला आहे. त्यावरुन अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची गरज आहे. मात्र भारतानं या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. याआधी ट्रम्प यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलं होतं. 

भारतानं अमेरिकेशी चांगले संबंध राखले आहेत. त्यामुळे अमेरिका एखादं औषध मागत असल्यास त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यासाठी भारताकडे कोणतंही कारण नाही, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'हा त्यांचा (पंतप्रधान मोदींचा) निर्णय असल्याचं मी कुठेही ऐकलेलं नाही. त्यांनी हे औषधं इतर देशांमध्ये पाठवण्यावर निर्बंध लादले आहेत, याची मला कल्पना आहे. मी काल त्यांच्याशी संवाद साधला होता. आमच्यात चांगली चर्चा झाली. भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध उत्तम आहेत,' असं ट्रम्प पुढे म्हणाले.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवण्याबद्दल विचार करू, असं पंतप्रधान मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती त्यांनी दिली. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू, असं ट्रम्प म्हणाले. मोदींनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीला परवानगी दिली नाही तरीही ठीक आहे. मग आम्ही प्रत्युत्तरादाखल आवश्यक कारवाई करू आणि ती करायलाच हवी ना?, असा प्रश्न उपस्थितांना विचारत ट्रम्प यांनी भारताला अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

भारत आणि अमेरिकेच्या उत्तम व्यापारी संबंधांचा संदर्भ देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले जातील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. भारतानं निर्बंध न उठवल्यास कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. कोरोनाचा सामना करण्यासाठी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी यांचं सहकार्य मागितलं होतं. मलेरियासारख्या आजाराचा सामना करण्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन महत्त्वाची भूमिका बजावतं. कोरोनाग्रस्तांवर उपचार करतानाही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मोठी मदत होते. 
 

Web Title: Coronavirus Donald Trump Gave Signs If India Did Not Give Hydroxychloroquine Medicine Us will take action kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.