Coronavirus: ...आता परिणाम भोगायला तयार राहा, डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 01:20 PM2020-04-14T13:20:58+5:302020-04-14T13:41:19+5:30
चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे. चीननं या व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे पूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला थेट धमकीच देऊन टाकली आहे. चीनविरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत, हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं, असंही पत्रकाराला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
रिपब्लिकन खासदारांची चीनविरोधात कारवाईची मागणी
सिनेटर स्टिव्ह डेन्सने यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. अमेरिकेनं चीनवर वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणांसाठी अवलंबून राहणं संपुष्टात आणलं पाहिजे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी चीननं जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ)च्या माध्यमातून अमेरिकेचा फायदा उचलल्याचा आरोप केला होता. चीन निष्पक्षपणे वागला नाही, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा अमेरिकेनं दिली आहे. चीन 30 वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनवर ट्रम्प यांचा हल्लाबोल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सतत कोरोना व्हायरसच्या संबंधीची माहिती लपवल्याचा आरोप केलेला आहे. या विषाणूसंदर्भात चीननं प्रारंभिक माहिती लपवल्यानं त्याचा जगाला परिणाम भोगावा लागत आहे. कोरोना व्हायरस हा चिनी व्हायरस असून, जग त्यांच्या चीनच्या कर्मांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगतो आहे. वेळेत माहिती दिली असती तर कोरोनाला चीनमध्येच रोखता आलं असतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे.