CoronaVirus: भारतावर दबाव आणून आखलेला ट्रम्प यांचा 'तो' प्लान फसला?; शेकडोंचे प्राण धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:40 AM2020-04-24T04:40:20+5:302020-04-24T07:07:35+5:30
कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता.
वॉशिंग्टन : कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता. मात्र, या औषधामुळे प्राण धोक्यात येत असल्याचा दावा अमेरिकेतील काही वैद्यक करीत आहेत. मात्र, अशा काही घटना असल्या तरी मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असून, याबाबत बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भारताने मार्च महिन्यात हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनसह विविध प्रकारच्या २६ औषधांना आणि वैद्यकीय वस्तूंच्या निर्यातीस बंदी घातली होती. कोरोनाच्या उपचारामधे हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन प्रभावी ठरत असल्याने ट्रम्प यांनी निर्यातबंदी उठविण्याची भारताकडे मागणी केली होती. भारताने तसे न केल्यास त्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर भारताने निर्यातबंदी मागे घेत अमेरिकेला औषधांचा पुरवठा सुरू केला. मात्र, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या औषधामुळे रुग्णांच्या मृत्यूत वाढ झाली आहे. ट्रम्प म्हणाले या बाबत केवळ एकाच रुग्णाचा अहवाल वाईट आला आहे. मात्र, अनेकांना औषधाचा फायदाच झाला आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेला या प्रकरणी लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकाराचा लवकरात लवकर उलगडा करण्याची सूचनाही दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.