CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी चीनने केलं, तेच आता भारतानेही करावं; डॉ. अँथनी फाउची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:45 AM2021-05-10T11:45:08+5:302021-05-10T11:46:16+5:30
CoronaVirus: अमेरिकेतील ज्येष्ठ विशेषज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारताकडे केवळ एकच पर्याय असल्याचे म्हटले आहे.
वॉशिंग्टन: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ज्येष्ठ विशेषज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी कोरोना नियंत्रणासाठी भारताकडे केवळ एकच पर्याय असल्याचे म्हटले आहे. (coronavirus dr anthony fauci says getting people vaccinated only long term solution to india)
डॉ. फाउची हे अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत. भारतातील रुग्णालयात ऑक्सिजन, पीपीई किट्स आणि अन्य वैद्यकीय सामग्री, उपकरणांचा तुटवडा असून अमेरिकेने मदतीसाठी पुढे यायला हवे, असेही त्यांनी म्हटले. एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले पाहिजे. भारत जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारा देश आहे. त्यांना लस निर्मितीसाठी स्वत:च्या देशातील साधनांसोबतच जगभरातून मदत केली जात आहे, असे ते म्हणाले.
शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू
भारताला लस निर्मितीसाठी मदत केली पाहिजे
जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी मदत केली पाहिजे किंवा भारताला जास्तीत जास्त लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे गरजेचे आहे. भारताला हे करावे लागेल. रुग्णालयांमध्ये बेड्स नसल्याने तुम्ही लोकांना रस्त्यावर फिरु देऊ शकत नाही. तिथे ऑक्सिजनसंदर्भातील परिस्थितीही अंत्यंत नाजूक आहे. लोकांना ऑक्सिजन न मिळणे हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारताकडे केवळ एकच पर्याय
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे नमूद करत, तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालयांची उभारणी करून बेड्स, ऑक्सिजन, पीपीई कीट आणि आरोग्य सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, असे मत फाउची यांनी व्यक्त केले आहे. भारतातील परिस्थिती गंभीर आहे. जेव्हा जास्त लोकांना संसर्ग होत असतो तेव्हा त्यांची पुरेशी काळजी घेणेही गरजेचे असते, असे काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. भारताने संपूर्ण लॉकडाउन लागू केला तरच हा प्रश्न सुटू शकेल. गेल्या वर्षी चीनने तेच केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इतर देशांनी मर्यादित प्रमाणात का होईना लॉकडाउन केला. तुम्हाला त्यासाठी सहा महिने लॉकडाऊन ची गरज नाही केवळ काही आठवडे लॉकडाऊन केला, तरी त्याचा परिणाम दिसून येईल, असेही ते म्हणाले.
तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ०१ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.