Coronavirus: जगात भारी...कोल्हापुरी; अमेरिकेत मराठमोळा संशोधक शोधतोय कोरोनावर लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:34 PM2020-03-19T13:34:12+5:302020-03-19T13:53:48+5:30
कोल्हापुरातील हुपरी येथील शेंडुरे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य करत आहेत.
मुंबई - संपूर्ण जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ९ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. चीन, इटली याठिकाणी या व्हायरसने मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली आहे. तर अमेरिका, भारत याठिकाणीही कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १७५ च्या वर पोहचली आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचे ४९ रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. अमेरिका, चीनकडून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरिकेच्या सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये एक पथक दिवसरात्र कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या संशोधनाचं नेतृत्व एका मराठी माणसाच्या हाती असल्याचं कौतुक सध्या होत आहे.
कोल्हापूरातील संशोधक जय शेंडुरे यांनी कोरोनावर लस शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. यापूर्वी जय शेडुंरे यांनी बाळाच्या जन्मापुर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचं संशोधन केलं होतं त्याला गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २०१२ मध्ये विकसित करण्यात आली होती.
कोल्हापुरातील हुपरी येथील शेंडुरे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. अमेरिकेतील सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये ते संशोधक म्हणून कार्यरत आहे. तापजन्य आजारावर संशोधन करण्यासाठी या सेंटरची उभारणी करण्यात आली होती. सध्या जगभरात दहशत असणाऱ्या कोरोनाचा शिरकाव अमेरिकेतही झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सेंटरच्या माध्यमातून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या त्यांनी बनवलेल्या औषधावर चाचणी घेण्याचं काम सुरु आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोनावर मात करण्यासाठी मदत मिळणार आहे.
याबाबत न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना जय शेंडुरे म्हणाले की, सध्या जगभरात कोरोनाचा अभूतपूर्व फैलाव झाला आहे. अनेक जण या व्हायरसच्या कचाट्यात सापडत असून ९ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. अशा कठिण परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी वेगवान हालचाली करण्याची गरज आहे. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी लवकरात लवकर यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.