Coronavirus: बिअर पिणाऱ्यांसाठी धोका, रेड वाईन शौकिनांना दिलासा; कोरोनावर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:22 PM2022-01-25T14:22:05+5:302022-01-25T14:22:25+5:30
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणापासून बचावासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे लसीकरण
नवी दिल्ली – मागील २ वर्षापासून जगातील बहुतांश देश कोरोना महामारीशी लढा देत आहेत. यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्रं मेहनत घेतायेत. कोरोनापासून बचावासाठी काय खावं अन् काय नाही याचे सल्ले देत आहेत. अलीकडेच फ्रंटियर्स इन न्यूट्रीशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, आठवड्याला ५ ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका १७ टक्क्यांनी कमी होतो असा दावा करण्यात आला आहे.
कोरोनापासून कसं वाचवते रेड वाईन?
ब्रिटीश वेबसाइट मिररनुसार, चीनच्या शेनझेन कांगनिंग हॉस्पिटलमध्ये ब्रिटीश नागरिकांचा डेटा अभ्यासून यावर रिसर्च तयार केला आहे. यात वैज्ञानिकांनी ब्रिटनच्या लोकांची दारु पिण्याची सवय आणि कोरोना हिस्ट्री याचा अभ्यास केला आहे. रेड वाईनमध्ये पॉलीफेनोल नावाचं एक कपाउंड असतं जे फ्ल्यू आणि दुसऱ्या श्वास घेण्याच्या आजारापासून दूर ठेवण्यात मदत करते. त्याच कारणाने या ड्रिंकचं सेवन करण्याने कोरोना संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.
व्हाईट वाईन आणि शॅम्पेनही व्हायरसविरोधात प्रभावी
वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे, व्हाईट वाईन आणि शॅम्पेनसारखे ड्रिंक्सही कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करतात. जे लोक आठवड्यातून १ ते ४ ग्लास व्हाईट वाईन अथवा शॅम्पेन पितात त्यांना कोविड संक्रमणाचा धोका ८ टक्क्यांनी कमी होतो.
कोरोनामध्ये बिअर आणि साइडर पिणं धोक्याचं
रिपोर्टनुसार, बिअर आणि साइडर पिणाऱ्या लोकांना कोरोना होण्याचा धोका जवळपास २८ टक्के जास्त असतो. जर तुम्ही या ड्रिंक्सचं सेवन आठवड्यातून ५ ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक करत असाल तर सावधान राहा. जे लोकं यापेक्षा अधिक बिअर आणि साइडरचं सेवन करतात त्यांना कोरोना व्हायरसचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो. त्यासाठी वैज्ञानिक जास्त दारु पिण्याचा सल्ला देत नाहीत.
कोरोनापासून बचाव एकमेव पर्याय लसीकरण
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणापासून बचावासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे लसीकरण, सध्या भारतात १५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षावरील नागरिकांना जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी बूस्टर डोस अभियानाची सुरुवात १० जानेवारीपासून सुरु झाली आहे.
देशात प्रतिदिन ३ लाखांहून अधिक रुग्ण
देशात सलग ५ व्या दिवशी ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी ३ लाख ६ हजार ६४ नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यावेळी २.४३ लाख लोकं बरे झाले. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील दिवसांत नव्या संक्रमितांमध्ये २७ हजारांनी घट झाली आहे.