CoronaVirus: एमिरेट्सच्या विमानात आता असेल दोन प्रवाशांत रिकामे सीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:27 AM2020-04-23T02:27:56+5:302020-04-23T07:09:48+5:30
कर्मचाऱ्यांसाठी नवा सुरक्षित गणवेश; खाद्यपदार्थ आणि पेये (बेव्हरिजेस) दिली जातील बेंटो-स्टाईल्ड बॉक्सेसमध्ये
दुबई : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी एमिरेटस कंपनीच्या विमानात दोन प्रवाशांत किंवा कुटुंबाच्या गटांमध्ये रिकाम्या सीटस असतील आणि कॅबिन बॅगेजही नेण्यास परवानगी नसेल. याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क, ग्लोव्हज, गाऊन व हेल्मेट असा नवा गणवेश वापरणार आहे. कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दोन प्रवाशांमध्ये किंवा कुटुंबाच्या गटांत रिकाम्या सीट आधीच ठेवल्या जातील, असे दुबईस्थित या विमान कंपनीने निवेदनात म्हटले.
कोविड-१९ चा उद्रेक झाल्यानंतर एमिरेटस कंपनीने तिची बरीच प्रवासी उड्डाणे रद्द केलेली असून, आता हळूहळू कामकाज सुरू करीत आहे. दुबईबाहेर जाणाºया प्रवाशांची चाचणीही कंपनीने सुरू केलेली आहे. प्रवाशांशी थेट संबंध येणारे कॅबिन क्रू, बोर्डिंग एजंटस् आणि ग्राऊंड स्टाफ आता वैयक्तिक सुरक्षा उपकरणात (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट-पीपीई) दिसतील. त्यांच्या मूळ गणवेशाच्या वर प्रोटेक्टिव्ह डिस्पोसेबल गाऊन असेल. याशिवाय सेफ्टी व्हिझर, मास्क व ग्लोव्हज असतील, असे त्यात म्हटले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे सगळे ग्राहक व कर्मचाºयांसाठी ग्लोव्हज आणि मास्क अनिवार्य आहे आणि सगळे प्रवासी व कर्मचारी यांचे तापमान थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासले जाईल. चेक इन आणि बोर्डिंगच्या वेळी दोघांमध्ये अंतर राखले गेले आहे की, नाही हे दर्शवणारी यंत्रे (इंडिकेटर्स) मैदानावर व प्रतीक्षालय भागांत बसवण्यात आली आहेत. प्रवाशांना चेक इनपासून ते विमानातून उतरेपर्यंत संपूर्ण प्रवासात मास्क व ग्लोव्हज वापरणे बंधनकारक आहे. विषाणूचा फैलाव स्पर्शाद्वारे होऊ नये म्हणून कंपनीने कोणतेही मासिक किंवा छापील साहित्य वापरण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. प्रवाशांना लॅपटॉप, हँडबॅग, ब्रिफकेस किंवा बाळांसाठीचे आवश्यक सामानच बरोबर नेता येईल. एमिरेटसने आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणांसाठी विमानातील सेवांमध्येही सुधारणा केल्या आहेत.
खाद्यपदार्थ आणि पेये (बेव्हरिजेस) पूर्वीप्रमाणेच दिली जातील; परंतु आता ती बेंटो-स्टाईल्ड बॉक्सेसमध्ये. क्रू आणि प्रवासी यांच्यात कमीतकमी संपर्क यावा, असा उद्देश यामागे आहे. सँडविचेस, बेव्हरिजेस, स्नॅक्स आणि डेसर्टस् प्रवाशांना पर्सनल बॉक्सेसमध्ये मिळतील.
प्रत्येक चेक इन डेस्कपाशी प्रवासी आणि कर्मचारी यांना कामकाजाच्या वेळी अतिरिक्त सुरक्षा मिळावी यासाठी प्रोटेक्टिव्ह बॅरियर्स लावण्यात आले आहेत. एमिरेटस कंपनीने आपले प्रवासी आणि कर्मचारी यांचे आरोग्य आणि सुरक्षितता कोणतीही किंमत मोजून राखण्याचे ठरवले आहे.
यामुळे फक्त कंपनीचे क्रू आणि इतर कर्मचाऱ्यांनाच प्रोत्साहन मिळेल, असे नाही तर प्रवाशांनाही ते विमानातून प्रवास करताना सुरक्षेच्या दर्जाची जाणीव होईल, असेही निवेदनात म्हटले आहे