Coronavirus News: आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य होणार; युरोपातील 2 मोठे देश महत्त्वपूर्ण निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 08:25 PM2020-07-14T20:25:48+5:302020-07-14T20:48:00+5:30
कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी दोन देशांचे प्रयत्न सुरू
लंडन/पॅरिस: कोरोनाचा कहर झेललेल्या युरोपातील दोन प्रमुख देशांमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सनं हा निर्णय घेतला. याची घोषणा अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी केली. त्याआधी इंग्लंडनं अशाच प्रकारचा निर्णय घेतला. २४ जुलैपासून इंग्लंडमधील दुकानं आणि सुपरमार्केट्समध्ये मास्क घालणं बंधनकारक असेल. मास्क न घातल्यास १०० पाऊंडचा दंड ठोठावण्यात येईल.
इंग्लंडनं कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं, असा धोक्याचा इशारा वैद्यकीय विज्ञान अकादमीनं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. इंग्लंडमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय इंग्लंड सरकारनं घेतला आहे.
इंग्लंड आणि फ्रान्सच्या आधी स्पेन, इटली आणि जर्मनी या युरोपातल्या इतर महत्त्वाच्या देशांनीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेस मास्क अनिवार्य केला आहे. यानंतर आता इंग्लंडनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्तकेतेचा उपाय म्हणून नागरिकांसाठी फेस मास्क बंधनकारक केला आहे.
चीनच्या वुहाननंतर कोरोनानं युरोपमध्ये थैमान घातलं. इटलीला कोरोनाचा मोठा फटका बसला. इंग्लंड आणि फ्रान्समध्येही कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली होती. फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ७२ हजार ३७७ रुग्ण आढळून आले. यापैकी ३० हजार जणांचा मृत्यू झाला. तर इंग्लंडमध्ये २ लाख ९० हजार १३३ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ४४ हजार ८३० जण मृत्यूमुखी पडले. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.