CoronaVirus: चिंताजनक! अमेरिकेत दर पाचवी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:11 AM2020-04-21T01:11:36+5:302020-04-21T06:48:52+5:30
३९ लाखांवर नागरिकांची केली तपासणी, बाधितांची संख्या ७.६५ लाखांपुढे
- विशाल शिर्के
पुणे : जगभरातील एकूण कोरोना (कोविड-१९) बाधितांपैकी तब्बल तीस टक्के रुग्ण असलेल्या अमेरिकेत अधिकाधिक नागरिकांची चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. अमेरिकेतील तब्बल चाळीस राज्यांमधे नागरिकांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. सोमवार अखेरीस (दि. २०) ३८ लाख ८२ हजार २ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील बाधितांची संख्या साडेसात लाखांवर गेली आहे. याचाच अर्थ घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी दर पाचवी चाचणी पॉझिटीव्ह (कोरोनाबाधित) असल्याचे समोर येत आहे.
चीन आणि भारतानंतर लोकसंख्येत अमेरिकेचा क्रमांक लागतो. पहिल्या आणि दुसºया क्रमांकावरील दोन्ही देशांची लोकसंख्ये प्रत्येकी १३३ कोटींच्या पुढे आहे. तर, अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटींवर आहे. सर्वाधित लोकसंख्या असलेल्या आणि सामाजिक जीवनमान तुलनेने खालावले असलेल्या भारतामधे कोरोनाचा फैलाव वेगाने होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, देशात राबविलेल्या उपाययोजनांमुळे अजूनही भारताने कोरोनाला हात-पाय पसरूदिलेले नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील बाधितांचा वेग इतर देशांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घटल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतातील बाधितांची संख्या १८ हजारांच्या आसपास आहे. चीनमधे बाधितांचा आकडा ८५ हजारांच्या घरात आहे. या देशाने नवीन रुग्णांची संख्या शंभराच्या आत आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे.
सोमवारी दुपारपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २४ लाख ६ हजार ७४५ वर पोहोचली होती. त्या पैकी अमेरिकेतील बाधितांचा आकडा ७ लाख ५९ हजार ६९६ वर गेला होता. अमेरिकेसह जगभरातील बाधितांमधे सातत्याने वाढच होत आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत असल्याने, अमेरिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी आणि कॅलिफोर्निया स्टेटला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. न्यूयॉर्कमधे तब्बल सव्वासहा लाख नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, कॅलिफोर्नियामधे पावणेतीन लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. टेक्सास, न्यू जर्सी, मॅसॅच्युसेट येथे प्रत्येकी पावणेदोन लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. मॅसॅच्युसेट्स, पेनसिल्वानिया, लुझियाना, इलिनॉय आणि वॉशिंग्टनमधे सव्वालाख ते १ लाख ६० हजारदरम्यान नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती प्रसिद्ध जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने प्रसिद्ध केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये ५५000 रुग्ण हॉस्पिटलमध्ये
न्यूयॉर्कमधील रुग्णालयांमधे सोमवारी दुपारपर्यंत तब्बल ५५ हजार ७२३ नागरिकांवर उपचार सुरू होते. पाठोपाठ न्यूजर्सी ७४९४, कॅलिफोर्निया ४,९३६, इलिनॉयमधे ४ हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील प्रमुख राज्यांची कोरोना चाचणीची शनिवारपर्यंतची आकडेवारी
न्यूयॉर्क ६,१७,५५५
कॅलिफोर्निया २,८०,९००
फ्लोरिडा २,६०,७२४
टेक्सास १,८२,७१०
न्यू जर्सी १,७०,६८८
मॅसॅच्युसेट १,६२,२४१
पेनसिल्वानिया १,५८,८५४
लुझियाना १,४१,५०४
वॉशिंग्टन १,३५,७०६
इलिनॉय १,४३,३१८
मिशिगन १,०९,०००