Coronavirus: अमेरिकेत स्थिती अतिभयंकर होण्याची भीती; रोजचे नवे बाधित लाखाच्या पुढे जातील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:17 AM2020-07-02T01:17:11+5:302020-07-02T01:17:27+5:30
योग्य वेळी ‘लॉकडाऊन’ लागू न केल्याचा परिणाम
वॉशिंग्टन : कोरोनाची भीषणता ओळखून सरकार व जनता जबाबदारीने वागणार नसेल, तर अमेरिकेतील साथीचा प्रसार भयावह पातळीवर पोहोचून रोज नव्या बाधितांची संख्या एक लाखाच्या पुढे जाईल, असा इशारा साथीच्या रोगांच्या प्रमुख तज्ज्ञाने दिला आहे.
अमेरिकेच्या दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना आणि एक डझनाहूनही अधिक राज्यांत रोज हजारो नवे रुग्ण रुग्णालयांत दाखल होत असताना ‘नॅशनल इस्टिट्यूट फॉर अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शस डिसीजेस’चे संचालक अँथनी फॉसी यांनी बुधवारी सेनेटच्या आरोग्यविषयक समितीपुढे हा इशारा दिला. मृतांचा आकडा किती वाढू शकेल, याचाही अंदाज मी सांगू शकतो; पण तो सांगितला, तर तुम्ही हादरून जाल, असे फॉसी म्हणाले.
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील रोजच्या नव्या रुग्णांच्या संख्येने ४७,७९२ हा नवा उच्चांक गाठला. ही संख्या २५ एप्रिलच्या ३४,२०३ या विक्रमी संख्येहून ३० टक्के अधिक होती. फॉसी यांनी रोजची रुग्णसंख्या लाखाच्या पुढे जाण्याचा इशारा दिला आहे. फॉसी यांनी याचा ठपका योग्य वेळी व पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू न केले जाण्यावर ठेवला. ते म्हणाले की, जेमतेम निम्म्या अमेरिकेत ‘लॉकडाऊन’ केले गेले. या तुलनेत युरोपीय संघातील देशांमध्ये ९५ टक्के ‘लॉकडाऊन’ लागू झाले. फॉसी यांनी व्यक्त केलेली भीती अनाठायी नाही. टेक्सास, अॅरिझोना, नेवाडा, साऊथ कॅरोलायना, मॉन्टाना, जॉर्जिया व कॅलिफोर्निया या राज्यांमध्ये इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात २५ टक्क्यांनी वाढले आहे.
मास्कवरूनही राजकारण
बाहेर जाताना मास्क वापरणे हा कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे; पण अमेरिकेत मास्क वापरण्यावरूनही वाद, मतभेद शिगेला पोहोचले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच ‘बिलकूल मास्क वापरू नका’, असे सांगत आहेत. त्यामुळे मास्क वापरणे वा न वापरणे हे रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट असण्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे.