Coronavirus : चीनमध्ये कमी रुग्ण; इटली आणि इराणमध्ये हाहाकार, परदेशी प्रवाशांवरही घातली बंधने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 06:49 AM2020-03-18T06:49:58+5:302020-03-18T06:50:20+5:30
इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २७ हजार ९८0 झाली असून, या आजाराने आतापर्यंत २१५८ जणांचा बळी घेतला आहे.
बीजिंग/रोम : चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी इटलीमध्ये मात्र त्यात वाढ होत आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २७ हजार ९८0 झाली असून, या आजाराने आतापर्यंत २१५८ जणांचा बळी घेतला आहे.
जगभरातील १४५ देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या सात हजारांवर गेली आहे. या आजाराचे जगात १ लाख ८३ हजार रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. अमेरिका, चीनसह सर्व देशांनी परदेशांतून येणाºया प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवायला सुरुवात केली आहे.
कोरोनाचा हाहाकार आॅगस्टपर्यंत सुरूच राहील, अशी भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ८५ जणांचा बळी घेतला आहे आणि रुग्णांची संख्या ४५00 झाली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण अमेरिकेत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालये तसेच विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत. तसेच रेस्टॉरंट्स, बार व करमणुकीच्या कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली आहे.
इटलीमध्ये या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २७४९ आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७३ असून ४,९0७ जणांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. एकूण रुग्णांपैकी २१,२२२ जणांना कोरोनाची किरकोळ लागण झाली असून, २८५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या पाच दिवसांपासून इटलीतील औषधांची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, कंपन्या, कार्यालये, बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद आहेत.
चीनमध्ये मंगळवारी एकाच व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र परदेशांतून आलेल्या २0 जणांना लागण झाल्याचे सांगण्यात आले. चीनमध्ये आज १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ३२२६ झाली आहे. मात्र चीनच्या अनेक प्रांतांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहे. ठराविक वेळेतच लोकांना खरेदीसाठी बाजारात जाण्याची संमती आहे. ठराविक दुकाने व मॉल काही वेळेसाठीच खुली ठेवली जात आहेत. (वृत्तसंस्था)
इराणमध्ये ८५३ मृत
पाकिस्तानात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८९ वर गेली आहे. त्यापैकी १५५ रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आहेत. या प्रांताच्या सीमा इराणला लागून आहे आणि इराणमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १५ हजारांहून अधिक असून, मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता ८५३ झाला आहे.
युरोपीय संघाच्या सीमा बंद
युरोपीय देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. सीमा बंद केल्यामुळे युरोपीय संघ म्हणून एकत्र येण्याला अर्थच राहिलेला नाही, अशी तेथील नागरिकांची तक्रार आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी युरोपीय देशांतून येणाऱ्यांना बंदी घातली आहे.
... तर ब्रिटन उद्ध्वस्त होईल
लंडन: कोरोनाचा संसर्ग युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्सनंतर ब्रिटनमध्ये होत असून, या संसर्गजन्य आजाराने ब्रिटन उद्धवस्त होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. द गार्डियन या वृत्तपत्राने शास्त्रज्ञांचा हवाला देऊ न म्हटले आहे की, ब्रिटनला पुढील किमान
एक वर्ष कोरोनाच्या संसर्गाशी सामना करावा लागणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टीमच्या अहवालानुसार, वर्षभरात ब्रिटनमधील सुमारे ८0 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे.
स्पेनमध्ये 9000 रुग्ण
स्पेनमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असून, एका दिवसात तिथे एक हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले. तिथे रुग्णांची संख्या सुमारे ९ हजार असून, आतापर्यंत २९७ जण मरण पावले आहेत. माद्रिदमध्ये चार हजारांहून अधिक लोकांना लागण झाली आहे. देशात आरोग्य सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल, रेस्टॉरंट्स बंद आहेत. देशातील साडेचार कोटी लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषधे व खाद्यपदार्थ घेण्यासाठीच लोकांना बाहेर जाण्याची परवानगी आहे.