coronavirus: पाकिस्तानातील मोठ्या नेत्यांवर कोरोनाचा कहर, माजी पंतप्रधानांनाही झाला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:38 PM2020-06-08T22:38:55+5:302020-06-08T22:42:30+5:30
यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील अनेक मोठ्या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते.
पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पीएमएल-एन च्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी खाकान यांना कोरोना झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, खाकान यांनी स्वतःला घरीच आयसोलेट करून घेतले आहे.
शाहिद खाकान अब्बासी हे पीएमएल-एन चे वरिष्ठ नेते असून, पक्षाचे नेते नवाझ शरीफ यांना न्यायालयाने पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर त्यांनी. अॉगस्ट २०१७ ते मे २०१८ या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपद सांभाळले होते.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री शहरयार आफ्रिदी, पीएमएल-एन चे खासदार मियाँ नावेद अली आणि पीपीपी नेते शरजील मेमन यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तान तहरीक ए इंसाफचे प्रांतीय सदस्य चौधरी अली अख्तर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता त्यांच्या यादीत शेख रशिद अहमद आणि शाहिद खाकान अब्बासी यांचा समावेश झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे एक प्रांतीय मंत्री आणि चार खासदारांचा मृत्यू झाला आहे