coronavirus: ...तर कोरोनाचा 'केमिकल लोच्या' होऊन तो नष्ट होतो; चीनमध्ये फॉर्म्युला सापडला?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:32 AM2020-05-16T05:32:54+5:302020-05-16T10:51:22+5:30
चीनी संशोधकांचा असा दावा आहे की, केवळ एक अँटीबॉडी कोरोनाला नष्ट करण्यासाठी सक्षम नसल्याने त्यासाठी काही अँटीबॉडीचा ग्रुप तयार करावा लागेल.
बीजिंग : चीनच्या वुहान प्रांतात सगळ्यात पहिल्यांदा कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. नंतर अल्पावधित या साथीने जगभर थैैमान घातले. आजमितीला जगभरात ४५ लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे तर ३ लाखांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. हा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप होत आहे. अशातच चीनमधील काही संशोधकांनी कोरोनाला नष्ट करू शकतील, अशा अँटीबॉडीजचा शोध लावल्याचा दावा केला
आहे.
चीनी संशोधकांचा असा दावा आहे की, केवळ एक अँटीबॉडी कोरोनाला नष्ट करण्यासाठी सक्षम नसल्याने त्यासाठी काही अँटीबॉडीचा ग्रुप तयार करावा लागेल.
या दिशेने काम करीत असताना त्यांना ४ अशा अँटीबॉडीजचा शोध लागला आहे. कोरोनापासून बऱ्या झालेल्या व्यक्तींमधून ४ अँटीबॉडीज काढण्यात चीनमधील
२४ पेक्षा अधिक संशोधकांना यश मिळाले आहे.
या अँटीबॉडीजची नावे बी ३८, एच ४, बी५ आणि एच २ अशी आहेत. या ४ अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या बाहेरील थरावर असलेल्या एस प्रोटीनला मानवी शरीरातील पेशींना चिटकू देत नाहीत. यामुळे विषाणूचे एस प्रोटीन नष्ट होऊ लागते. त्यामुळे विषाणू पुढची रासायनिक प्रक्रिया करण्यात अपयशी ठरतो व त्यामुळेच नष्ट होतो, असा संशोधकांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)
चीनची बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी आणि बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ लाइफ सायन्स यासह चीनमधील डझनभर संस्था आणि संशोधक या ४ अँटीबॉडीज शोधण्यात गुंतले होते. या अँटीबॉडीजच्या शोधाबाबत अहवाल अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट आॅफ सायन्स या मासिकात प्रकाशित झाला आहे. या अँटीबॉडीजच्या मदतीने चिनी संशोधकांना कोरेना विषाणूला नष्ट करण्याचा नवा फॉर्म्युलाच सापडला आहे.