coronavirus: खोट्या माहितीविरोधात जागतिक अभियान! इंग्लंड, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेचा संयुक्त उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:46 AM2020-05-14T03:46:18+5:302020-05-14T03:47:03+5:30

इंग्लंड : सध्या जगभरात दोन गोष्टी अतिशय वेगानं पसरत आहेत. अर्थातच त्यातली पहिली गोष्ट आहे, ती म्हणजे कोरोना व्हायरस. या ...

coronavirus: Global Campaign Against False Information! A joint venture between England, the BBC and the World Health Organization | coronavirus: खोट्या माहितीविरोधात जागतिक अभियान! इंग्लंड, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेचा संयुक्त उपक्रम

coronavirus: खोट्या माहितीविरोधात जागतिक अभियान! इंग्लंड, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेचा संयुक्त उपक्रम

Next

इंग्लंडसध्या जगभरात दोन गोष्टी अतिशय वेगानं पसरत आहेत. अर्थातच त्यातली पहिली गोष्ट आहे, ती म्हणजे कोरोना व्हायरस. या व्हायरसला आटोक्यात ठेवण्यासाठी जगभरात प्रत्येक देश आटोकाट प्रयत्न करतो आहे. त्यात काही देशांना आता हळूहळू यश येतंय. कोरोनाच्या या वेगाला तर आता हळूहळू अटकाव बसतोय; पण कोरोनाच्या चुकीच्या बातमी, त्याबद्दलची खोटी माहिती, सोशल मीडियावरून क्षणार्धात व्हायरल होणारा अर्धवट, काही वेळा बनावट तपशील, याचा प्रचार आणि प्रसार मात्र खूपच झपाट्यानं होतोय.

कोणीही, काहीही ऐकलं, पाहिलं, त्याच्या पुढ्यात आलं, की पुढे, दुसऱ्याकडे ढकलण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, असं करताना आपण पुढे सरकवत असलेली ही माहिती खरंच योग्य, खरी आहे की नाही, याची कोणीच खातरजमा केलेली नसते. कोरोनाबाबतच्या या फेक न्यूजमुळेही अनेक देश आणि आरोग्य संघटना चिंतेत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्याचे उपाय, तर सुरूच आहेत; पण इंग्लंडनं आता त्याच्याच जोडीनं कोरोनाच्या खोट्या, चुकीच्या प्रसारालाही प्राधान्यानं प्रतिबंध घालायचं ठरविलं आहे. इंग्लंडनं या नव्या लढाईत आपले अधिकृत राष्ट्रीय प्रसारण ‘बीबीसी’लाही सामील करून घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही त्यासाठी आपला हात पुढे केला आहे. आता हे तिघे मिळून कोरोनाच्या खोट्या प्रचाराविरुद्ध खरी लढाई लढणार आहेत.

कोरोनाबाबतच्या चुकीच्या आणि खोट्या माहितीविरुद्ध या तिघांनी मिळून ‘स्टॉप द स्प्रेड’ हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे.
सध्या जी जी खरी-खोटी, चुकीची माहिती बाहेर येते आहे, त्यावर या तिघांकडूनही ‘डबल चेक’ ठेवला जाताना त्यांची शहानिशा केली जाईल आणि त्यानुसार बीबीसीची चॅनेल्स, वेबसाईट्स आणि अ‍ॅप्सवरून त्याचे प्रसारण केले जाईल. ज्या ज्या अविश्वसनीय स्रोतांकडून माहिती बाहेर येईल, त्यावरही आता त्यांची नजर असणार आहे.

यासंदर्भात इंग्लंड सरकार, बीबीसी आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी संयुक्त निवेदनही प्रसारित केले आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी इंग्लंड सरकार अर्थसाहाय्य पुरवत आहे. हा उपक्रम खरोखरच लोकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, लोक ‘कोरोना साक्षर’ होत आहेत की नाहीत, याची तपासणीही या मोहिमेतून केली जाणार आहे. अर्थातच हा उपक्रम त्यांनी फक्त आपल्या देशापुरताच ठेवलेला नाही. इतर देशांनाही ही माहिती पुरविली जाणार असून, त्याचं भाषांतर करण्यासाठी, त्याचबरोबर यासंदर्भातलं टुलकिट पुरविण्यासाठीही मदत केली जाणार आहे. ज्या ज्या देशांना हे टुलकिट हवे आहे, त्यांना ते पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या आधी कोरोनाच्या खोट्या वृत्तांना आळा घालण्याचं आवाहनही या त्रिपक्षीय सदस्यांनी केलं आहे.

Web Title: coronavirus: Global Campaign Against False Information! A joint venture between England, the BBC and the World Health Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.