Coronavirus: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांवर; ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:21 PM2020-04-03T12:21:52+5:302020-04-03T12:25:51+5:30
अमेरिकेत २ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १८० हून अधिक देशांना फटका बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजारांपर्यंत पोहचला आहे. अमेरिका, इटली, स्पेन या देशांत कोरोनाचा प्रार्दुभाव जलदगतीने होत आहे.
अमेरिकेत २ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जर ३० एप्रिलपर्यंत सोशल डिस्टेंसिंगचं कठोर पालन न केल्यास अमेरिकेत कोरोना व्हायरसचा हाहाकार माजेल, इतकचं नाही तर २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल अशी भीती खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. जगात इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचं दिसून येतं. इटलीत कोरोनामुळे १३ हजारांहून जास्त लोकांचा जीव गेला आहे.
इंडोनेशिया सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. याठिकाणी प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांच्या घरी जातात. इंडोनेशियात आतापर्यंत १७९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १७० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस इतक्या वेगाने पसरत आहे की, जगभरात गेल्या २४ तासांत ५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीत गेल्या २४ तासात ७६० जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत आतापर्यंत १ लाख १५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी याठिकाणी २ हजार ४७७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येत स्पेन दुसऱ्या स्थानावर आहे. याठिकाणी १० हजार ३४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ फ्रान्समध्ये ५ हजार ३८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या हुबई याठिकाणी ३ हजार १९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ५०० पर्यंत पोहचली आहे तर ७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली लोकांना ताकीद; ‘ती’ चूक पुन्हा करु नका, अन्यथा...
तिमिरातुनी तेजाकडे... ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या: पंतप्रधान
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!
Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण
Coronavirus: 'तबलिगी जमातचे 'ते' लोक नर्सेस समोरच बदलतात कपडे, करतात अश्लील कृत्ये'