CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:18 AM2020-04-22T02:18:23+5:302020-04-22T06:54:02+5:30

प्रारंभी दाखविले नाही गांभीर्य; प्रतिकारशक्ती विकसित करण्याचे धोरण फसल्याची भावना

CoronaVirus herd immunity causes big problem for England | CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला

CoronaVirus: 'तो' प्लान फसला अन् घात झाला; ब्रिटनमध्ये कोरोनानं १७ हजार जणांचा बळी घेतला

Next

- संदीप शिंदे

मुंबई : कोरोनाचा फैलाव जगभरात होत असताना बहुसंख्य देशांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या पयार्याचा स्वीकार केला; मात्र इंग्लंडच्या सरकारने लोकांमध्ये प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढवून ‘कोविड-१९’वर मात करण्याचे धाडसी धोरण सुरुवातीला स्वीकारले. त्यात सपशेल अपयश आले आणि इंग्लंडचा घात झाला. आता दिवसागणिक वाढणारे रुग्ण आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे कोरोनाची दहशतही वाढू लागल्याचे मत गेल्या दहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक असलेल्या नितीन कैलाजे यांनी व्यक्त केले आहे.

आजघडीला इंग्लंडमध्ये सव्वा लाख नागरिकांना बाधा झाली असून, तब्बल १६ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमधून या आजाराचा फैलाव जगभर सुरू झाल्यानंतरही त्याचे गांभीर्य इथल्या सरकारला नव्हते. इटली आणि स्पेन या देशांनी जी चूक केली तीच आपण करतोय, असे इथले एक नामांकित वृत्तपत्र सातत्याने सांगत होते. जागतिक आरोग्य संघटनेने ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्रीचा अवलंब करा असे बजावले होते; परंतु आजाराचा फैलाव झाला, तरी भीती बाळगू नका. लोकांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होईल. फार तर विविध आजारांनी ग्रासलेल्या वयोवृद्धांचा मृत्यू ओढावेल; परंतु आपण कोरोनावर त्यावर मात करू, अशी हाळी सरकारकडून दिली जात होती. त्यानंतर इटली आणि स्पेनमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले. कोरोना विषाणूने तरुणांचा सुद्धा घास घ्यायला सुरुवात केली. वाढत्या रुग्णांचा भार पेलणे आरोग्य यंत्रणांना अवघड झाले. तेव्हा इथले सरकार खडबडून जागे झाले आणि लॉकडाऊनची घोषणा केली; परंतु तोपर्यंत ३ ते ४ आठवडे निघून गेले होते आणि या भयंकर विषाणूने देशात हातपाय पसरले होते, अशी खंत कैलाजे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी इथले वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत; मात्र गेल्या काही वर्षांत सरकारने ‘कॉस्ट कटिंग’च्या नावाखाली या भागातील आरोग्य व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ही व्यवस्था काहीशी डळमळीत झाल्याचे दिसते. विद्यमान सरकार ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याची चर्चाही इथे टिपेला पोहोचली आहे.

मृतांमध्ये ६० वर्षांपुढील ८०%
इंग्लंडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या १६ हजार ५०९ पैकी ७ हजार ८६४ जण हे ८० पेक्षा जास्त वयाचे आहेत. ६० ते ८० वयोगटांतील मृतांची संख्या ५ हजार ८६५ इतकी आहे. त्यावरून ज्येष्ठांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट होते.

आम्ही काळजी घेतो, तुम्हीही घ्या
इथे अनेक भारतीय वास्तव्याला आहेत. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष गाठीभेटी होत नसल्या तरी एकमेकांना फोन करून प्रत्येक जण आधार देत असतो. या अस्वस्थ काळात हे सपोर्ट ग्रुप अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. इथली परिस्थिती बिकट असल्याने नातेवाईक, मित्रमंडळींचे काळजी करणारे फोन भारतातूनही येतात. तुम्ही काळजी घ्या, आम्हीही घेतो असाच एकमेकांचा सूर असतो, असेही नितीन कै लाजे यांनी सांगितले.

असंख्य कर्मचारी फर्लोवर
भारतातील कारागृहातील कैद्यांना फर्लो रजा मंजूर केली जाते; परंतु इंग्लंडमध्ये कर्मचाऱ्यांना दोन महिने बिनपगारी रजेवर पाठविण्याच्या प्रकाराला फर्लो म्हणतात. त्यांना प्रत्येकी २५०० पौंड किंवा त्यांच्या वेतनाच्या ८० टक्के रक्कम (जी कमी असेल ती) दिली जात आहे. छोट्या उद्योगांना कर्ज पुरवठा, मासिक हप्ते, घरांचे भाडे, क्रेडिट कार्डची देणी अदा करण्यास सरकारने सलवत दिली आहे.

Web Title: CoronaVirus herd immunity causes big problem for England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.