Coronavirus: कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट किती धोकादायक? दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नव्या रिपोर्टने चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:56 PM2021-12-03T13:56:05+5:302021-12-03T13:56:43+5:30
Corona Virus, Omicron variant: कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधून या व्हेरिएंटबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक महातीच्या आधारावर गुरुवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जोहान्सबर्ग - कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमधून या व्हेरिएंटबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक महातीच्या आधारावर गुरुवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामधून या व्हेरिएंटबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. हा रिपोर्ट मेडिकल प्री प्रिंट सर्व्हरवर अपलोड करण्यात आला आहे. मात्र त्याचे परीक्षण अद्याप झालेले नाही.
आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील नऊ प्रांतांपैकी पाच प्रांतांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. मात्र हा व्हेरिएंट संपूर्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये परसला असल्याची शक्यता आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत समोर आलेल्या रिपोर्टनुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा आणि बीटाच्या तुलनेमध्ये तीन पट अधिक संसर्ग पसरवून शकतो. म्हणजेच ज्यांना कोविड-१९ चा संसर्ग आधीच झालेला आहे, त्यांनाही पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार २७नोव्हेंबरपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या २८ लाखा लोकांपैकी ३५ हजार, ६७० जणांना पुन्हा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ९० दिवसांनंतर जर कुणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याला रिइन्फेक्शन मानले जाते. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्याने तो अधिक संसर्गजन्य असू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांमी आधीच वर्तवली होती.
दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे दिसत आहे. तसेत त्यावर लसीचा प्रभाव दिसून येत नाही आहे. मात्र लस अजूनही या भयावह आजाराविरोधात संरक्षण देत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगितले होते. मात्र तज्ज्ञ हा व्हेरिएंट केवळ सामान्य लक्षणांचा आजार ठरेल, याबाबत आताच काही सांगणे घाईचे ठरेल, असे सांगत आहेत. सुरुवातीला ओमायक्रॉनचा संसर्ग कमी वयाच्या रुग्णांमध्ये दिसून येत होता. मात्र आता अधिक वयाचे लोकही या विषाणूची शिकार बनत आहेत.
KRISP जीनोमिक्स इन्स्टिट्युटचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ रिचर्ड लेसेल्स यांनी सांगितले की, हा विषाणू किती धोकादायक ठरू शकतो, याचा अंदाज घेणे काही कारणांमुळे कठीण होत आहे. त्यातील लसीकरण हे महत्त्वाचं कारण आहे. अनेक जणांनी लस घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली झालेली आहे. तसेच त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे, याचा अंदाज घेणे कठीण बनले आहे.