CoronaVirus: कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला मोठा दिलासा, १.४ बिलियन डॉलरचं अतिरिक्त कर्ज मंजूर- IMF
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:02 PM2020-04-17T13:02:50+5:302020-04-17T13:04:21+5:30
पाकिस्तानला या निधीचा उपयोग आपली तिजोरी भरण्यासाठी होणार आहे.
इस्लामाबाद: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच अर्थव्यवस्थेसमोरही गंभीर संकट उभं ठाकलं आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही खिळखिळी झाली असून, एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देण्याची त्यांच्याकडे ताकद नाही. त्यामुळेच पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीसाठी हात पसरले होते, त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही पाकिस्तानला १.४ बिलियन डॉलरचं अतिरिक्त कर्ज मंजूर केलं आहे. पाकिस्तानला या निधीचा उपयोग आपली तिजोरी भरण्यासाठी होणार आहे.
दुसरीकडे पाकिस्ताननं नुकसानीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून गेल्या वर्षी जुलैमध्ये ६ बिलियन डॉलरचं कर्ज घेतलं होतं. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात येणारं हे कर्जाचं पॅकेज अतिरिक्त असणार आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देश आणि जगाला संबोधून एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी जगाच्या देशांना पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान यांचे हे आवाहनही म्हणजे कोरोनाच्या निमित्तानं कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जातेय. ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ संदेशात इम्रान खान यांनी जगाच्या वित्तीय संस्थांना आवाहन केले होते की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं, असंही त्यांनी सांगितलं होतं.International Monetary Fund (IMF) approves $1.4 billion in #coronavirus aid to Pakistan: AFP news agency pic.twitter.com/g4eQxo9KuB
— ANI (@ANI) April 16, 2020
'उपासमारीपासून लोकांना वाचवा'
इम्रानने व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले होते की, लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवायचे आहे, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, या परिस्थितीतून त्यांना स्वत: चे संरक्षणही करावे लागणार आहे. जागतिक समुदायाने लोकांना उपासमारीपासून वाचविणे आवश्यक आहे. विकसनशील देशांना भेडसावणारी समस्या वेगळी असून, विकसनशील आणि विकसित देशांकडे असलेल्या स्त्रोतांमध्ये खूप असमानता आहे. विकसनशील देशांकडे आता आरोग्य सेवांवर अतिरिक्त पैसे खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नाही.
पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे १३४ जणांचा गेला जीव
पाकिस्तान कोरोनानं पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ हजारांच्या पार गेली आहे. तर १३४ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात १६०० लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच पाकिस्तानच्या सिंध प्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या २ हजारांच्या पार गेली आहे.