coronavirus : इम्युनिटी पासपोर्ट?, जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 02:46 AM2020-04-28T02:46:26+5:302020-04-28T06:27:36+5:30
जर्मनी आणि चिली यांसारख्या देशांनी तर कोरोनातून बरे झालेल्या लोकांना चक्क ‘इम्युनिटी पासपोर्ट’ देण्याचं जाहीर केलं आहे.
जगात लक्षावधी लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्याचप्रमाणे लाखो लोक कोरोनातून मुक्तही झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीही सोडण्यात आलं; पण एकदा कोरोनाची लागण झाली म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला त्याची लागण होत नाही, असा समज अनेक लोकांमध्ये अगदी डॉक्टर आणि काही संशोधकांमध्येही आहे, त्यामुळे एकदा कोरोनाची लागण होऊन गेली म्हणजे आता आपल्याला, त्या व्यक्तीला त्याचा काहीच धोका नाही आणि काहीही करायला, बाहेर फिरायला आपल्याला आता मुक्त परवाना मिळाला आहे, असाच अनेकांचा समज आहे. अगदी विविध सरकारांनीही त्याला पुष्टी देताना कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी सूट दिली आहे. जर्मनी आणि चिली यांसारख्या देशांनी तर कोरोनातून बरे झालेल्या लोकांना चक्क ‘इम्युनिटी पासपोर्ट’ देण्याचं जाहीर केलं आहे.
काय आहे हा इम्युनिटी पासपोर्ट?
याचा अर्थ जे लोक कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना एकप्रकारचा पासपोर्ट देणं. म्हणजेच कोरोनाकाळात इतरांवर जी बंधनं लादली गेली आहेत, त्यांच्या बाहेर जाण्यावर, इतर कोणत्याही गोष्टी करण्यावर ज्या मर्यादा आल्या, आणल्या आहेत, त्यातून या व्यक्तींना सूट देणं. त्यांना बाहेर पडण्यास, कामावर जाण्यास मोकळीक देणं!
पण यासदंर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं कालच तातडीचं एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, जगातल्या सर्वच देशांना त्यांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे तो तुम्हाला पुन्हा होणार नाही, याची काहीही शाश्वती नाही. त्याला काही शास्त्रीय आधारही नाही. उलट अशा कृतींमुळे कोरोनाला अटकाव करण्याचा जो प्रयत्न त्या त्या देशांनी आजवर केला आहे, तो उलटण्याचीच शक्यता आहे आणि आजवर केलेल्या साºया प्रयत्नांवर पाणी फिरेल, त्यामुळे ज्या देशांनी कोरोनातून बरे झालेल्या लोकांना ‘मुक्त परवाना’ देण्याचा विचार केला असेल किंवा असे परवाने दिले असतील, तर त्यांनी ते तातडीने मागे घ्यावेत.
ज्या लोकांना आधी कोरोना होऊन गेला आणि उपचारानंतर ते बरे झालेत, अशा लोकांना पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण कमी आहे, हे आतापर्यंतच्या निरीक्षणातून दिसून आलेलं आहे; पण ते अजून सिद्ध झालेलं नाही; त्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे. त्यानंतरच याबाबत ठोस काही सांगता येईल; पण तोपर्यंत तरी कोणीही या गैरसमजात राहू नये, अन्यथा कोरोनाचा झंझावात पुन्हा सुरू झाला तर त्याला आवरणं मग अशक्यप्राय होऊन बसेल, असा सावधानतेचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
त्यामुळे जर्मनी आणि चिली यांसारख्या ज्या देशांनी आपल्या नागरिकांना ‘इम्युनिटी पासपोर्ट’ दिले आहेत, त्यांना आपल्या निर्णयाचा आता पुनर्विचार करावा लागणार आहे; पण चिलीने हा इशारा धुडकावताना नागरिकांना अशी प्रमाणपत्रे देण्याचं जाहीर केलं आहे.