Coronavirus in China: कोरोना नव्हे, चीनमधील जनतेला 'या' गोष्टीचं टेन्शन, शांघायमधील परिस्थिती पाहून बीजिंगवासिय धास्तावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:32 AM2022-05-05T10:32:35+5:302022-05-05T10:33:20+5:30
चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेला चीन आता या महामारीमधून सर्वात शेवटी बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीजिंग-
चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. कोरोनामुळे सर्वात आधी प्रभावित झालेला चीन आता या महामारीमधून सर्वात शेवटी बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण लागू केले आहे. हे धोरण कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी असले तरी आता ते चिनी नागरिकांसाठी क्रूरतेचा कळस ठरताना दिसत आहे. चीनच्या शांघायमध्ये सध्या परिस्थिती अशी झालीय की आता लोकांना कोरोनापेक्षा लॉकडाऊनच्या नियमांचीच जास्त भीती वाटत आहे.
शांघाय गेल्या अनेक आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. जनतेकडील अन्नधान्य संपत चाललं आहे आणि सरकारकडून दिलं जाणारे अन्न पुरेसं नाही. बीजिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे जेणेकरून शांघायसारखे लॉकडाऊन होऊ नये. Guanzhou मध्ये फक्त एक संशयित रुग्ण आढळल्यानंतर, विमान प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि ५.६ कोटी लोकांची चाचणी घेण्यात आली. ज्या भागात लॉकडाऊन आहे, तिथं पांढरे पीपीई किट घातलेले आरोग्य कर्मचारी रस्त्यावर फिरत आहेत. लोकांनी नाराजी व्यक्त करत त्यांना आता 'व्हाइट गार्ड्स' असं नाव दिलं आहे.
1000 लोकांना जबरदस्तीने क्वारंटाईनमध्ये पाठवले
लॉकडाऊन दरम्यान चीन सरकार लोकांवर पाळत ठेवण्यासाठी रोबोटिक श्वान आणि ड्रोनचा वापर करत आहे, त्याविरोधात लोकही संतापले आहेत. लोकांनी कुठेही जमू नये, अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा रोबोटिक डॉग आणि ड्रोनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. एवढंच नाही तर चीन सरकार जबरदस्तीनं लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवत आहे. शांघायच्या बिकाई भागात सुमारे १ हाजर लोकांना जबरदस्तीने क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांची घरं सॅनिटाइज केली जात आहेत. आम्हाला व्हायरसपेक्षा लॉकडाऊनची जास्त भीती वाटू लागलीय, असं शांघायमधील एका व्यक्तीनं सांगितलं.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंचा धुमाकूळ
चीनमधील लोक लॉकडाऊनशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यातील काही खरे आहेत तर काही व्हिडिओचं सत्य माहीत नाही, त्यामुळे अफवाही वेगाने पसरत आहेत. WeChat वर एका इमारतीला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तो खरा आहे. पण एका महिलेनं सहाव्या मजल्यावरून उडी मारल्याचा व्हिडिओ चुकीचा आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावरही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. लोक सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आहेत, ज्यामध्ये दोन गाजर, एक भोपळा आणि बेदाणे आहेत. चीन आपल्या हुकूमशाही वृत्तीनं लोकांना नाराज करत आहे अशी प्रतिमा सोशल मीडियात तयार झाली आहे. साथीच्या रोगासोबतच झिरो कोविड धोरण, कुचकामी लस, खराब लस आणि मृत्यूंची चुकीची आकडेवारी हे सारं सरकारचं अपयश दाखवणारं आहे.